‘अस्मिता प्लस’ घेणार महिला, मुलींच्या आरोग्याची काळजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2020 01:15 AM2020-10-04T01:15:42+5:302020-10-04T01:15:49+5:30
अल्पदरात सॅनिटरी पॅडचा पुरवठा; जिल्हा परिषदेचा पुढाकार
ठाणे : सागरी, नागरी अणि डोंगरी आदी क्षेत्रांत विस्तारलेला ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भाग लक्षात घेऊन तेथील महिलांसह किशोरवयीन मुलींसाठी 'अस्मिता प्लस' या योजनेची अंमलबजावणी युद्धपातळीवर करून अल्पदरात सॅनिटरी पॅडचा पुरवठा ठाणे जिल्हा परिषदेकडून केला जात आहे.
गावपाड्यांमध्ये ‘अस्मिता प्लस’ योजनेच्या कामाची संपूर्ण जबाबदारी त्यात्या गावांतील महिला बचत गटांकडून पार पाडली जात आहे. शाळकरी मुलींना अवघ्या पाच रुपयांत, तर किशोरी मुलींना आणि महिलांना २४ रुपयांत सॅनिटरी पॅड पुरवण्यात येत आहे. जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, अंबरनाथ आणि कल्याण आदी तालुक्यांतील ३१९ गावपाड्यांमध्ये या ‘अस्मिता प्लस’ योजनेचा लाभ महिला व किशोरींना करून दिला जात आहे. सर्वाधिक मुरबाड तालुक्यातील १३१ गावांचा समावेश या योजनेत केला आहे.
महिलांना (मुलींना) मासिकपाळीच्या वेळी योग्य काळजीच्या अभावामुळे आरोग्याच्या समस्या उद्भवतात. तसेच जिल्हा परिषद शाळांमधील मुली मासिकपाळीच्या कालावधीत घरीच राहतात. तर, काहींनी शाळादेखील सोडल्या आहेत. याशिवाय, या पाळीच्या कालावधीतील काळजीच्या अभावामुळे आरोग्याच्या समस्यांनादेखील महिला व मुलींना तोंड द्यावे लागत आहे. महिलांच्या या गंभीर समस्येकडे जिल्हा परिषदेने लक्ष केंद्रित करून शाळांमधील विद्यार्थिनींची संख्या कायम राहावी, यासह आरोग्याच्या समस्येतून सुटका व्हावी, या दृष्टिकोनातून ही योजना गांभीर्याने राबविण्यात येत आहे.
निधीच्या उपलब्धतेसह बचत गटांना मिळणार रोजगार
ठाणे : महिला व बालकल्याण विभागाची ही ‘अस्मिता प्लस’ योजना जिल्ह्यात सक्रियपणे राबवण्यात येत आहे. याशिवाय, जिल्हा ग्रामीण विकास विभागाने ही योजना हाती घेतली आहे. तिच्या माध्यमातून बचत गटांना रोजगार देऊन ग्रामीण मुली आणि महिलांच्या सक्षमीकरणासह आरोग्याच्या विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या जागर कार्यक्रमातून ८१९ गावांपैकी ३५१ गावांमध्ये अल्प किमतीत सॅनिटरी पॅडचा पुरवठा केला आहे. या योजनेच्या गावांमधील बचत गटांना १०० पॅडच्या एका पाकिटाची विक्री केल्यास पाकिटामागे ४०० ते ४५० रुपये मिळतात. त्यामुळे टाळेबंदीच्या काळात बचत गटांना या योजनेतून उत्पन्नाचे नवे साधन मिळाले आहे.