उल्हासनगरात रस्त्याची दुरावस्था, रस्त्यातील खड्डे भरण्यासाठी काँग्रेसचे डांबर व सिमेंट दान अभियान
By सदानंद नाईक | Published: October 6, 2023 07:16 PM2023-10-06T19:16:57+5:302023-10-06T19:16:57+5:30
उल्हासनगरात रस्ते दुरुस्ती झाल्यानंतर काहीं दिवसात रस्त्याची जैसे थे स्थिती होत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनीं केला आहे.
उल्हासनगर: महापालिकेने रस्त्यातील खड्डे भरण्यावर कोट्यवधीचा खर्च करूनही रस्त्याची कधीनव्हे दुरावस्था झाली आहे. नागरिकांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून काँग्रेस पक्षाकडून डांबर व सिमेंट दान अभियान राबविणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनीं दिली.
उल्हासनगरात रस्ते दुरुस्ती झाल्यानंतर काहीं दिवसात रस्त्याची जैसे थे स्थिती होत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनीं केला आहे. गणेशोत्सवा दरम्यान भर पावसात केलेले काही रस्त्याचे डांबरीकरण, दुसऱ्याच दिवशी वाहून गेले. तसेच रस्त्याचे खड्डे भरण्यावर महापालिका बांधकाम विभागाने, कोट्यावधीचा खर्च केला. मात्र आज पुन्हा त्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. येणाऱ्या दसरा व दिवाळी सणा दरम्यान महापालिकेकडून रस्ते दुरुस्ती दर्जेदार होण्यासाठी काँग्रेसने अभियान राबविणार असल्याची माहिती काँग्रेस पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी माहिती दिली. रस्ते दुरुस्ती वेळी डांबर व सिमेंटचा वापर ठेकेदारांनी कमी करू नये म्हणुन काँग्रेस पक्षाकडून डांबर व सिमेंट दान अभियान राबविण्यात येणार असल्याचे साळवे म्हणाले.
महापालिकेकडून नेमलेले रस्त्यांचे ठेकेदार डांबरीकरणांच्या रस्त्यात डांबर तर सिमेंट कॉंक्रिट रस्त्यामध्ये सिमेंट कमी वापरत असल्याने, काहीं दिवसात रस्त्याची दुरावस्था होत आहे. तसेच अधिकाऱ्यांचा ठेकेदारांवर कोणताही अंकुश नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे रस्ते वारंवार खराब होत आहेत. असे साळवे यांचे म्हणणें आहे. शहरातील रस्ते दर्जेदार होण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने, महापालिकेस डांबर व सिमेंट दान करणार आहेत. नागरिकांनी सदर अभियानात सहकार्य करायचे आवाहन, साळवे यांनी केले असून १० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ पर्येंत आपले डांबर व सिमेंट दान उल्हासनगर काँग्रेस कार्यालय येथे दान द्यावे. नागरिकांच्या दानातून जमा झालेले सिमेंट व डांबर महापालिकेत जमा करण्यात येणार असून याबाबत लेखी पत्र उल्हासनगर महापालिका आयुक्त यांना देण्यात आल्याची माहिती साळवे यांनी दिली आहे.