पुलांवरील खड्ड्यांमध्ये अखेर पडले डांबर; एमएसआरडीसीकडून मास्टिक पद्धतीचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2020 12:34 AM2020-07-22T00:34:00+5:302020-07-22T00:34:09+5:30
वाहनचालकांना दिलासा
डोंबिवली : कल्याण-शीळ महामार्ग तसेच पत्रीपुलाच्या शेजारील पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना घडत असल्याने मनसे आ. प्रमोद पाटील यांनी नाराजी व्यक्त करत राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) १८ जुलैला पत्र लिहिले होते. एमएसआरडीसीने त्याची दखल घेत मंगळवारी मास्टिक पद्धतीचा वापर करून डांबराने खड्डे बुजवण्यास सुरुवात केली.
पावसामुळे कल्याण-शीळ महामार्ग व पत्रीपुलाच्या शेजारच्या पुलावर खड्डे पडले होते. ते खड्डे चिखल आणि खडी यांच्या मिश्रणातून बुजवले जात असल्याची छायाचित्रे पाटील यांनी टिष्ट्वट केली होती. तसेच एमएसआरडीसीच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्रेही पाठवली होती. त्यावर अधिकाऱ्यांनी असे काही सुरू नसल्याचा दावा केला होता. पण जेव्हा पाटील यांनी मी स्वत: येतो, संयुक्त पाहणी करू, असे सांगितल्यावर एमएसआरडीसी खडबडून जागी झाली. तसेच मंगळवारी पत्रीपुलाच्या शेजारील पुलावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाले.
एमएसआरडीसीच्या ठाणे येथील अभियंत्यांनी सांगितले की, ‘काटई, देसाई आणि पत्रीपुलाशेजारचा पूल या तीन पुलांवरील खड्डे विविध मार्गांनी बुजत नसल्याने अखेरीस डांबराची मास्टिक पद्धत वापरून ते खड्डे बुजवण्यात येत आहेत. या तीन पुलांवर सुमारे एक ते दीड किलोमीटर रस्त्याचे खड्डे बुजवण्यात आले आहेत. याआधी कल्याण-भिवंडी मार्गावरील दुर्गाडी पुलावर ही पद्धत वापरून मार्च, एप्रिलमध्ये खड्डे बुजवण्यात आले होते. तेथे आतापर्यंतच्या पावसात खड्डे पडलेले नाहीत, त्यामुळे त्याच पद्धतीने अन्य पुलांवरील खड्डे बुजवण्यात येत आहेत. आगामी काळात जेथे आवश्यकता असेल तेथे ही पद्धत वापरून खड्डे बुजवले जातील. तसेच रस्त्याची डागडुजी केली जाईल.’