अंबरनाथ कल्याण ग्रामीण जोड रस्त्यावरील डांबर गेले वाहून

By पंकज पाटील | Published: September 27, 2023 06:46 PM2023-09-27T18:46:04+5:302023-09-27T18:47:32+5:30

टँकर आणि रेडिमिक्स काँक्रीटच्या गाड्यांमुळे रस्ता झालाय अपघातग्रस्त.

asphalt of ambernath kalyan gramin road washed away | अंबरनाथ कल्याण ग्रामीण जोड रस्त्यावरील डांबर गेले वाहून

अंबरनाथ कल्याण ग्रामीण जोड रस्त्यावरील डांबर गेले वाहून

googlenewsNext

पंकज पाटील, अंबरनाथ: अंबरनाथ तालुक्याला कल्याण ग्रामीण भागाशी जोडणारा नालंबी रोड सध्या वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. हा रस्ता डोंगरावरून जात असल्यामुळे तो रस्ता सुस्थितीत ठेवणे गरजेचे होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या रस्त्याची योग्य दुरुस्ती न झाल्यामुळे या रस्त्यावरील सर्व डांबर वाहून गेले आहे. त्यामुळे या ठिकाणी वाहनांना अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अंबरनाथ शहराला कल्याण ग्रामीण भागाशी जोडणारा महत्त्वाचा रस्ता म्हणून नालंबी रोड ओळखला जातो. या ग्रामीण भागात असलेल्या नालंबी भिसोळ आणि आपटी ही सर्व गावे अंबरनाथ शहराशी जोडली गेली आहेत.

दैनंदिन व्यवहारासाठी ग्रामस्थ देखील अंबरनाथ शहरात येत असतात. पूर्वीपासून हा रस्ता नेहमीच सुस्थितीत राहिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेला हा रस्ता गेल्या दोन ते तीन वर्षांपासून नेहमीच धोकादायक अवस्थेत राहिला आहे. 2021 मध्ये या रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. मात्र दुरुस्ती केल्यानंतर वर्षभर देखील हा रस्ता टिकला नाही पहिल्याच पावसात हा रस्ता अनेक ठिकाणी खचला होता. रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची असल्याने त्या ठेकेदाराने पावसाळा झाल्यानंतर या ठिकाणी पॅचवर्क करून हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. मात्र ते काम देखील निकृष्ट झाल्यामुळे अवघ्या पाच ते सहा महिन्यातच अनेक ठिकाणी खड्डे पडले.

या रस्त्याची अवस्था बिकट असतानाच यंदाच्या पावसाळ्यात हा रस्ता पूर्णपणे खचला आहे. अंबरनाथच्या कोहजगाव पासून नालंबीकडे जाणाऱ्या या डोंगराळ रस्त्यावर अनेक ठिकाणी अवघड वळणे असल्यामुळे त्या ठिकाणी योग्य डांबरीकरण करणे गरजेचे होते. मात्र ते डांबरीकरण न केल्याने अवघड वळणावर मोठी वाहने उलटण्याचा धोका निर्माण झाला. अंबरनाथहुन टिटवाळाकडे जाण्यासाठी हा रस्ता महत्त्वपूर्ण आहे. या सोबतच हा रस्ता मुरबाडमार्गे नगरकडे जात असल्यामुळे अनेक वाहने या मार्गावरून जात असतात. उल्हास नदीमधून अनेक टँकर माफिया पाणी चोरून याच रस्त्यावरून अंबरनाथ शहरातील पुरवठा करीत आहेत त्यामुळे बेकायदेशीरपणे चालणाऱ्या टँकरमुळे हा रस्ता अनेक ठिकाणी खचला आहे. कल्याण ग्रामीण भागामध्ये अनेक ठिकाणी रेडिमिक्सचे प्लांट उभारण्यात आल्याने त्या प्लांट मधून अंबरनाथकडे मोठ्या प्रमाणात रेडिमिक्सच्या गाड्यांचा ताफा जात असल्याने हा रस्ता खचण्याचे प्रमाण वाढले.

Web Title: asphalt of ambernath kalyan gramin road washed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.