डांबराचे पॅच ठरताहेत कुचकामी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:28 AM2021-06-18T04:28:07+5:302021-06-18T04:28:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खड्डे बुजविण्यासाठी मारण्यात आलेले डांबराचे पॅच कुचकामी ठरल्याचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खड्डे बुजविण्यासाठी मारण्यात आलेले डांबराचे पॅच कुचकामी ठरल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे. डांबराच्या पॅचमधून खडी बाहेर पडत असल्याने खड्डे पडायला सुरुवात झाल्याने डांबरीकरण कामाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
दरवर्षी पावसाळ्यात खड्डे पडतात. त्याचा प्रत्यय पावसाच्या सुरुवातीलाच येऊ लागला आहे. पश्चिमेतील पारनाका, अत्रे रंगमंदिर रोड, शंकरराव चौक, कल्याण रेल्वेस्थानक रोड, लाल चौकी येथील रस्त्यांवरील खड्ड्यांच्या ठिकाणी डांबराचे पॅच मारण्यात आले होते. परंतु, गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसात या कामांचा दर्जा उघडकीस आला आहे. बहुतांश ठिकाणी टाकलेल्या डांबराच्या पॅचमधून खडी बाहेर पडायला सुरुवात झाली आहे. आधीच पॅच मारल्यामुळे रस्ता समपातळीत राहिला नसताना, दुसरीकडे आता खडी बाहेर पडू लागल्याने वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या त्रासात अधिकच भर पडली आहे.
एरव्ही केडीएमसीची महासभा असो अथवा स्थायी समित्यांच्या बैठकांमधून खड्ड्यांच्या मुद्द्यावर प्रशासनाला नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांकडून धारेवर धरले जाते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे महापालिकेची निवडणूक लांबणीवर पडली आहे. त्यात नगरसेवकांचा कालावधीही संपल्याने सध्या महापालिकेत प्रशासकीय राजवट लागू आहे. नगरसेवकांचा धाक राहिला नसल्याने थुंकपट्टीच्या माध्यमातून रस्त्यांची कामे मार्गी लावून प्रशासनाकडून वेळ मारून नेली जातेय का? असाही सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
----