भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीतील उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटच्या दिवशी इच्छुकांची झुंबड
By नितीन पंडित | Published: April 3, 2023 04:06 PM2023-04-03T16:06:53+5:302023-04-03T16:07:58+5:30
भिवंडी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजले.
नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: भिवंडी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीचे पडघम वाजले असून सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्वच राजकीय पक्षां मधील इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी एकाच गर्दी केली होती.भिवंडी कृषी उत्पन्न बाजार समिती च्या १८ सदस्य पदांकरीता २८ एप्रिल रोजी निवडणूक होत आहे .त्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक इच्छुकांनी कार्यालयात झुंबड केली होती.
या निवडणुकीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षा सोबत राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस महाविकास आघाडीत कुणबी सेना,जिजाऊ संघटना यांना सोबत घेऊन एकत्रित मोट बांधून ही निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.तर भाजपाने शिवसेना शिंदे गट यांना सहा तर मनसे व श्रमजीवी संघटना यांना प्रत्येकी एक जागा देत वरचष्मा राखला आहे .या निवडणुकीसाठी ग्रामपंचायत गटात ११३९ ,सहकारी सोसायटी गटात ३३८,व्यापारी व अडते गटात १०३ तर हमाल व माथाडी गटात ४८ मतदार नोंदविले गेले आहेत.
राज्यातील सत्तांतरानंतर तालुक्यात प्रथमच सहकार क्षेत्रातील निवडणुका होत असताना शिंदे गटा सह ठाकरे गटाचा कस लागणार आहे. आपापल्या पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज दाखल करताना आमदार शांताराम मोरे,शिवसेना शिंदे गट जिल्हा संपर्क प्रमुख सुरेश बाळ्या मामा म्हात्रे,जिल्हा प्रमुख देवानंद थळे,अरुण आर.पाटील,विष्णू चंदे,भाजपाचे तालुकाध्यक्ष पी के म्हात्रे,श्रीकांत गायकर,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विश्वास थळे,उपजिल्हाप्रमुख प्रकाश भोईर,जय भगत आदी पदाधिकारी उपस्थित होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"