संमेलनाचा निधी लटकला

By Admin | Published: February 22, 2017 06:27 AM2017-02-22T06:27:00+5:302017-02-22T06:27:00+5:30

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊन १५ दिवस उलटले तरी संमेलनासाठी निधी देण्याचे कबूल

Assembly funding hangs | संमेलनाचा निधी लटकला

संमेलनाचा निधी लटकला

googlenewsNext

जान्हवी मोर्ये / डोंबिवली
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होऊन १५ दिवस उलटले तरी संमेलनासाठी निधी देण्याचे कबूल करणाऱ्या लोकप्रतिनिधींनी अजूनही आयोजक संस्था आगरी यूथ फोरमला निधीचा धनादेश दिलेला नाही. निधी मिळावा, यासाठी फोरमचे कार्यकर्ते लोकप्रतिनिधींचे उंबरे झिझवत आहेत. मात्र, मुंबई, ठाणे, उल्हासनगर महापालिका निवडणुकांच्या आचारसंहितेचा त्यात अडसर येत आहे. आचारसंहिता संपल्यानंतर तरी हा निधी मिळणार की नाही, याविषयी फोरम साशंक आहे.
साहित्य संमेलनासाठी आर्थिक सहकार्य म्हणून आमदार निधीतील काही निधी मिळावा, यासाठी फोरमने राज्यातील विविध पक्षांच्या आमदारांशी पत्रव्यवहार केला होता. त्यावेळी १२ आमदारांनी निधी देण्याची तयारी दर्शविली होती. प्रत्येक आमदार किमान पाच लाख रुपये देणार होते. मात्र, संमेलनाच्या नियोजित तारखेच्या वेळीच महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली. त्यामुळे हा निधी आचारसंहितेच्या कचाट्यात अडकला. पण आता हा निधी मिळावा, यासाठी फोरम त्यांच्याकडे पाठपुरावा करीत आहेत. १२ आमदारांचे जवळपास ६० लाख रुपये फोरमला मिळणे अद्याप बाकी आहेत. त्याचबरोबर कल्याण-डोंबिवली महापालिकेने संमेलनासाठी ५० लाख रुपयांच्या निधीची घोषणा केली. परंतु, संमेलनाच्या आधी महापालिकेने २५ लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या
हस्ते फोरमकडे सुपूर्द केला होता. उर्वरित २५ लाखांचा निधी मिळलेला नाही. या निधीलाही कोकण शिक्षक आमदार मतदारसंघाच्या निवडणुकीच्या आचारसंहितेचा अडसर निर्माण झाला.
महापालिकांचे मतदान बुधवारी झाले. २३ तारखेला निकाल जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येणार आहे. त्यानंतर अपेक्षित ८५ लाखांचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आचारसंहिता संपल्यावरही हा निधी वेळेत मिळेल का, याविषयी फोरम साशंक आहे. संमेलनासाठी एक कोटी ५८ लाख रुपयांचा निधी जमा झाल्याचे संमेलनाचे स्वागताध्यक्ष गुलाब वझे यांनी स्पष्ट केले होते. मात्र, अपेक्षित निधी धरून ही रक्कम होती की नाही, याविषयी त्यांनी काहीच स्पष्ट केलेले नव्हते.
संमेलनासाठी उभारेलल्या पु. भा. भावे नगरीसाठी एक कोटी १३ लाख रुपये खर्च आला. संमेलनाचा ताळेबंद ५ मार्चपर्यंत सादर केला जाणार आहे. अपेक्षित निधी हाती न फोरमने आल्याने खर्च कसा फेडला, हा प्रश्नही अद्याप गुलदस्त्यातच आहे. त्यामुळे संमेलन संपल्यावरही संमेलनाच्या निधीचा प्रश्न अद्याप गाजतच आहे. संमेलनाचा खर्चात नेमकी कुठे व कशी काटकसर केली, हे फोरमने महामंडळास ताळेबंद सादर केल्यावरच स्पष्ट होईल. दरम्यान, आमदार त्यांचा शब्द पाळतात की नाही, याकडे आयोजकांसह महामंडळाचे लक्ष लागले आहे.


मराठी भाषा दिन साजरा करणार
आगरी युथ फोरमने नवव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानंतर आता २७ फेब्रुवारीला जागतिक मराठी भाषा दिन साजरा करण्याचे ठरवले आहे. या दिनाच्या कार्यक्रमाची रूपरेषा अद्याप ठरलेली नाही. असे असले तरी दर्जेदार कार्यक्रम केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.
च्सर्वसाधारणपणे संमेलन झाल्यानंतर आयोजक संस्थेकडून उपक्रम राबवणे शिथिल होते. मात्र, साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष व फोरमचे अध्यक्ष गुलाब वझे यांनी केवळ एक संमेलन घेऊन आगरी युथ फोरम थांबणार नाही, अशी ग्वाही दिली होती. दुसरीकडे, आयोजन समितीने साहित्य, संस्कृती आणि भाषासंवर्धनाचे कार्य सुरू ठेवावे. त्यासाठी पोषक कार्यक्रम घ्यावेत, असा सल्ला साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी दिला होता.

 २७ फेब्रुवारी हा कविवर्य वि.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस जागतिक मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिन आगरी युथ फोरमने उत्साहात साजरा करण्याचे ठरवले आहे. त्याची रूपरेषा लवकर ठरवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

ताळेबंद ५ मार्चपर्यंत देणार
साहित्य संमेलनाच्या खर्चाचे लेखापरीक्षण सुरू आहे. किती खर्च झाला, किती पैसे जमा झाले, याचा लेखाजोखा सुरू आहे. येत्या ५ मार्चपर्यंत साहित्य संमेलनाच्या खर्चाचा तपशील साहित्य महामंडळास सादर केला जाणार आहे.
च्साहित्यिकांना दिलेले मानधन, त्यांचा प्रवास खर्च याचाही हिशेब सुरू असून चारपाच साहित्यिकांचे धनादेश देणे बाकी आहे. ते लवकरच दिले जातील. किती साहित्यिकांनी प्रवास खर्च व मानधन नाकारले, याची माहिती काढण्यात येत आहे, असे आयोजन समितीने स्पष्ट केले.

Web Title: Assembly funding hangs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.