शहर सुरक्षेसाठी सोसायट्यांच्या सीसीटीव्हींची घेणार मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2020 01:13 AM2020-02-02T01:13:15+5:302020-02-02T01:13:34+5:30
ठाणे महापालिकेचा निर्णय
ठाणे : सुरक्षेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण शहरात १२०० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. मात्र, तरीदेखील बºयाच खाजगी सोसायट्यांच्या परिसरात एखादी घटना घडल्यास त्याचे पुरावे गोळा करण्यासाठी पोलीस यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागते. ही अडचण दूर करण्यासाठी आता खाजगी सोसायट्यांच्या परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेºयांची कनेक्टिव्हिटीदेखील पालिकेच्या हाजुरी येथील डाटा सेंटरला देण्यासाठी या सोसायट्यांना पालिका प्रशासन पत्र देणार आहे.
सोसायटीबाहेरचा परिसर ज्या कॅमेºयांनी कव्हर होणार आहे, त्याच कॅमेºयांची कनेक्टिव्हिटी देण्याची विनंती करण्यात येणार असून यासाठी कोणत्याही सोसायटीला कनेक्टिव्हिटी देणे बंधनकारक नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. ठाणे शहराचा शहरीकरणाच्या वेग जास्त असल्याने या शहरात विशेषकरून घोडबंदर पट्ट्यात मोठ्या प्रमाणात गृहसंकुले उभी राहिली असल्याने सुरक्षेचा प्रश्नदेखील गंभीर झाला आहे.
या पट्ट्यात अनेक गृहसंकुलांमध्ये सीसीटीव्ही कॅमेºयांचीदेखील सुविधा निर्माण केली असली, तरी त्याचा उपयोग केवळ सोसायटीला न होता गुन्ह्यांची उकल होण्यासाठी पोलीस आणि नागरी समस्यांसाठी पालिकेलादेखील होण्याच्या दृष्टीने या कॅमेºयांची कनेक्टिव्हिटी डाटा सेंटरकडे घेण्याचा प्रशासनाचा मानस आहे.
स्मार्टच नव्हे तर सुरक्षित शहरासाठीचे पाऊल
स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत शहराच्या नागरी समस्या सोडवण्याबरोबरच सुरक्षित शहर कसे निर्माण करता येईल, या दृष्टिकोनातून प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून संपूर्ण शहरात १६०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये आतापर्यंत शहराच्या प्रमुख ठिकाणी १२०० सीसीटीव्ही कॅमेरे बसवले असून उर्वरित कॅमेरे लवकरच पोलिसांच्या सल्ल्याने बसवण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यासाठी पोलीस विभागाला पत्रदेखील देण्यात येणार आहे.
मात्र, केवळ मुख्य रस्त्यांच्या सुरक्षिततेबरोबरच खाजगी सोसायट्यांच्या सुरक्षेचादेखील यामध्ये समावेश करण्याचा प्रशासनाचा मानस असून त्यादृष्टीने आता त्यांच्या बाहेरच्या बाजूला असलेल्या कॅमेºयांची कनेक्टिव्हिटी डाटा सेंटरला देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.