सहाय्यक आयुक्तांना मनसे पदाधिकाऱ्याची शिवीगाळ, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2019 12:43 AM2019-05-09T00:43:03+5:302019-05-09T00:43:38+5:30
सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांना मनसे पदाधिका-याने शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ कर्मचारी संघटनेने बुधवारी ‘पेन डाऊन’ आंदोलन केले.
उल्हासनगर : सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांना मनसे पदाधिकाºयाने शिवीगाळ केल्याच्या निषेधार्थ कर्मचारी संघटनेने बुधवारी ‘पेन डाऊन’ आंदोलन केले. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, महापालिका अधिकाऱ्यांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.
उल्हासनगर महापालिकेने लोकसभा निवडणुका पार पडताच अवैध बांधकामांवर धडक कारवाई सुरू केली. मंगळवारी असंख्य अवैध बांधकामे पोलीस संरक्षणात जमिनदोस्त केली. याप्रकरणी दोघांवर एमआरटीपी अंतर्गत गुन्हाही दाखल केला. त्यापुर्वी सोमवारी हिराघाट ते गुरूद्वारा रस्त्याचे रूंदीकरण करून २५ पेक्षा जास्त दुकानांवर पालिकेने पाडकाम कारवाई केली. या प्रकाराने अचानक प्रकाशझोतात आलेल्या अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांनी पाडकाम कारवाई सुरू ठेवण्याचे संकेत दिले. महापालिकेच्या कारवाईने भूमाफियांचे दाबे दणाणले असून, बुधवारीही पोलीस संरक्षणात पक्क्या बांधकामांवर पाडकाम करवाई होणार होती; मात्र मंगळवारी अतिक्रमण विभागाचे प्रमुख गणेश शिंपी यांच्यासोबत शिविगाळ करण्याचा प्रकार झाल्याने त्याला ब्रेक लागला.
अवैध बांधकामाचा अहवाल पालिकेत देण्यासाठी गेलेल्या गणेश शिंपी यांची गाठ मंगळवारी दुपारी मनसेचे विभाग प्रमुख योगिराज देशमूख यांच्याशी पडली. अवैध बांधकामावरून देशमुख यांनी शिंपी यांच्यासह वरिष्ठ अधिकाºयांना महापालिका मुख्यालयात शिविगाळ केली. शिंपी यांच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीसांनी देशमुख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. योगिराज देशमुख यांनीही शिंपी यांच्याविरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रत्येक वेळी महापालिका कर्मचारी व अधिकाºयांना होणाºया मारहाणीच्या निषेधार्थ कर्मचाºयांनी बुधवारपासून पेन डाऊन आंदोलन करून कठोर कारवाईची मागणी आयुक्तांकडे केली.
महापालिकेची सुरक्षा व्यवस्था कूचकामी
महापालिका अधिकारी व कर्मचाºयांना मारहाण, शिवीगाळ यासारख्या घटनांमध्ये वाढ झाली असून, यानिषेधार्थ किती दिवस आंदोलन करणार, असा प्रश्न अधिकाºयांकडून विचारला जात आहे. पालिकेत ८० टक्के वर्ग-१ व २ ची पदे रिक्त असून कनिष्ठ कर्मचाºयांकडे वर्ग-१ व २ चा पदभार दिल्याने, पालिकेत सावळागोंधळ निर्माण झाला आहे. महापालिकेच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे.