सहायक पोलीस निरीक्षक पाटील यांचा ‘कर्तव्य’सन्मान!
By admin | Published: June 2, 2017 05:02 AM2017-06-02T05:02:11+5:302017-06-02T05:02:11+5:30
पंधरावा कोकण परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे झाला. या मेळाव्यात टिटवाळा पोलीस ठाण्याचे
लोकमत न्यूज नेटवर्क
टिटवाळा : पंधरावा कोकण परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळावा रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे झाला. या मेळाव्यात टिटवाळा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांनी दोन सुवर्ण व एक रौप्य पदक पटकावले.
१४ वर्षांपासून हा कोकण परिक्षेत्रीय मेळावा घेतला जातो. या मेळाव्यात कोकण परिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पोलीस दलातील ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील अधिकारी व कर्मचारी सहभागी होतात. यामध्ये जिल्ह्याच्या ग्रामीण पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची निवड होते. सदर अधिकारी व कर्मचारी यांच्या कामाची पोचपावती बघून पोलीस अधीक्षक यांच्यामार्फत निवड करण्यात येते. कर्तव्य बजावताना विशेष कामगिरी केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मेळाव्यात मेडल देऊन सन्मानित करण्यात येते.
या मेळाव्यात कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अविनाश पाटील यांना गुन्हे तपास, फौजदारी कायदे, प्रक्रिया व न्यायालयीन निर्णय यासाठी दोन सुवर्ण व मुद्देमाल लेबलिंग व पॅकेजिंग याकरिता एक रौप्य पदक देऊन सन्मानित करण्यात आले. या मेळाव्यात जास्त मेडल मिळवलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची पुढे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य कर्तव्य मेळाव्याकरिता निवड होणार आहे. हा सन्मान माझा नसून पोलीस दलाचा व माझ्या वरिष्ठांचा आहे, असे मत अविनाश पाटील यांनी व्यक्त केले.