शासनाच्या आश्वासनानंतर पंडित यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 09:10 PM2020-06-01T21:10:06+5:302020-06-01T21:20:09+5:30
मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आदिवासींना शिधापत्रिका देणे, रोजगार व जीवनावश्यक वस्तू देणेबाबत संबंधित विभागांना सकारात्मक कार्यवाहीसाठीचे निर्देश राज्य शासनाने दिल्याचे पत्रात नमूद आहे.
मीरारोड - वंचित आदिवासींना अंत्योदय योजना आणि प्राधान्यक्रमाने शिधावाटप पत्रिका देऊन धान्य तसेच अन्य जीवनावश्यक वस्तू देण्याच्या मागणीसाठी रविवारी सकाळपासून सुरू केलेले बेमुदत अन्नत्यागाचे आंदोलन सोमवारी सायंकाळी श्रमजीवी संघटनेचे संस्थापक विवेक पंडित यांनी शासनाच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेतले.
उच्च न्यायालयात हमीपत्र देऊन देखील वंचित आदिवासींना अंत्योदय योजना आणि प्राधान्यक्रमाने शिधावाटप पत्रिका देऊन धान्य तसेच अन्य जीवनावश्यक वस्तू सरकारकडून दिल्या जात नसल्याने पंडित यांच्यासह त्यांच्या पत्नी विद्युल्लता, संघटनेचे रामभाऊ वारणा या तिन्ही 60 वर्षांवरील ज्येष्ठ नेत्यांनी रविवारी सकाळी 11 वाजल्यापासून वरसावे नाका येथील ठाण्याकडे जाणाऱ्या महामार्गावर बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते.
सोमवारी सायंकाळी शासनाचे उपसचिव ल. गो. ढोके यांचे लेखी पत्र मिळाल्यानंतर पंडित यांनी हॉटेल व्यावसायिक तलाह मुखी यांच्या हस्ते पेय घेऊन मरण उपोषण मागे घेतले. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आदिवासींना शिधापत्रिका देणे, रोजगार व जीवनावश्यक वस्तू देणेबाबत संबंधित विभागांना सकारात्मक कार्यवाहीसाठीचे निर्देश राज्य शासनाने दिल्याचे पत्रात नमूद आहे. दरम्यान पालघर आदी जिल्हाधिकाऱ्यांना देखील शिधापत्रिका देण्याचे निर्देश शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने दिले आहेत. अतिरिक्त इष्टांकाची मागणी शासनाकडे तात्काळ करावी असे कळवण्यात आले आहेत.