ज्योतिषाचार्य प्रा. विद्याधर घैसास यांच्या 'रंग राशींचे' व्याख्यानमालेस रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 04:45 PM2019-12-19T16:45:25+5:302019-12-19T16:54:54+5:30
अंतरंग व्यास खुली व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प प्रा. विद्याधर घैसास यांनी गुंफले.
ठाणे : दुर्बिणीतून अंतराळातील ग्रह ताऱ्यांचा वेध घेण्यापूर्वी माणसाच्या अंतरंगाचा, ज्ञानाचा, अथांग मनाचा शोध घेणे तितकेच मला महत्वाचे वाटते. ज्योतिष शास्त्र हे एक गंभीर शास्त्र आहे. बारा राशी म्हणजे माणसाची वेगवेगळी स्वभावदर्शने आहेत. ग्रह-ताऱ्यांचा तसाच विविध राशींचा चांगला-वाईट परिणाम माणसाच्या आयुष्यावर पडत असतोच परंतु आपण त्या स्थितीला सकारात्मक दृष्टीने सामोरे कसे जायचे , काय करावे काय करू नये हे ज्योतिषशास्त्र सांगते. साडेसातीचा काळ हा वाईट नसतोच. घाबरून जाऊ नये. त्या कालावधीतही चांगले काही घडतेच." ज्योतिषाचार्य प्रा. विद्याधर घैसास यांनी आपल्या 'रंग राशींचे' या व्याख्यानमालेतून रसिकांशी संवाद साधला.
त्याचवेळी बाराही राशींच्या स्वभावांची, वैशिष्ट्यांची अनेक उदाहरणे, हलके फुलके किस्से सांगून हा विषय अधिक सोपा आणि रंजक केला. शब्दांचे भांडार असलेली मिथुन रास, धीरगंभीर कर्क, अतिशय कडक-परखड सिंह रास, अतिचिकित्सक कन्या, फिलॉसॉफर रास म्हणजे तूळ, जिगरबाज-बेडर वृश्चिक, अतिचतुर, कसब पणाला लावणारी रास कुंभ, सरळ-साधी-सोपी जगणारी मीन. दीड तासाच्या व्याख्यानात प्रा. विद्याधर घैसास सरांनी अशा राशींवर अभ्यासपूर्ण विवेचन केले. व्याख्यानाच्या शेवटी प्रेक्षकांमधून विचारलेल्या प्रश्नांना प्रा घैसास सरांनी नेमकी उत्तरेही दिली. रसिकांनी केलेली गर्दी आयोजकांना सुखावून गेली. अंतरंग ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्था आणि व्यास क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या दोन दिवसाच्या व्याख्यान मालेची सांगता आज प्रा. विद्याधर घैसास यांच्या व्याख्यानाने झाली. प्रारंभी अंतरंग संस्थेचे अध्यक्ष अशोक पाटील आणि व्यासचे निलेश गायकवाड यांनी पाहुण्यांचे स्वागत केले आणि व्याख्यानमाला आयोजित करण्यामागची आपली भूमिका मांडली आणि आपल्या संस्थेची माहिती उपस्थितांना सांगितली. सुप्रसिद्ध गायिका मनीषा वायंगणकर यांनी सादर केलेल्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. दोन्ही दिवसांच्या व्याख्यानमालेचे सूत्रसंचालन कवी,चित्रकार रामदास खरे यांनी केले. व्याख्यान मालेचा दुसऱ्या दिवशीचा विषय होता "रंग राशींचे".हा विषय रंजक करण्या बरोबरच उपयुक्तही होईल याची काळजी सदरकर्ते प्रा. विद्याधर घैसास यांनी उत्तम घेतली.मार्मिक विनोद ,कविता आणि बोध वाक्ये यांची पखरण करत त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला होता.