एटीएम क्लोन करून ग्राहकांची फसवणूक, चौघांना अटक, महिलेचा समावेश : एटीएममध्ये आरोपींचे स्कीमर आणि कॅमेरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 03:58 AM2017-10-14T03:58:11+5:302017-10-14T03:58:32+5:30
एटीएमकार्ड क्लोन करून बँक ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढणाºया टोळीचा पर्दाफाश ठाण्याच्या सायबर सेलने केला. याप्रकरणी चार आरोपींना अटक केली
ठाणे : एटीएमकार्ड क्लोन करून बँक ग्राहकांच्या खात्यातून पैसे काढणाºया टोळीचा पर्दाफाश ठाण्याच्या सायबर सेलने केला. याप्रकरणी चार आरोपींना अटक केली असून त्यामध्ये एका महिलेचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली.
मुंब्रा-कौसा भागातील साउथ इंडियन बँक आणि इंडियन बँकेच्या एटीएममध्ये कार्ड क्लोन करून ४९ ग्राहकांच्या खात्यातून १९ लाख ७५ हजार रुपये काढल्याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सायबर सेलने या प्रकरणाचा समांतर तपास केला. पोलिसांनी एटीएममधील सीसीटीव्हीचे फुटेज मिळवून तपास सुरू केला. आरोपी निश्चित करण्यासाठी जवळपास ५ लाख ६१ हजार मोबाइल नंबर्सचे विश्लेषणही पोलिसांनी केले. या दरम्यान चार मोबाइल नंबरवर पोलिसांना संशय आला. हे चारही नंबर काही वेळासाठी सुरू व्हायचे आणि ते केवळ एकमेकांच्या संपर्कात असायचे. त्याअनुषंगाने पोलिसांनी तीन पुरुष आणि एक महिला आरोपीस मुंब्रा येथून ताब्यात घेऊन चौकशी केली.
एटीएममध्ये कार्ड स्वाइप केले जाते, त्या ठिकाणी आरोपी स्कीमर लावायचे. त्यामुळे ग्राहकाने कार्ड स्वाइप केले की, त्याचा तांत्रिक तपशील स्कीमरमध्ये रेकॉर्ड व्हायचा. याशिवाय, एटीएम मशीनमध्ये ग्राहक पिन नंबर टाकताना टिपला जाईल, अशा ठिकाणी वरील भागात चिनी बनावटीचा लहान कॅमेरा आरोपी लावायचे. काही तासांनी कॅमेरा आणि स्कीमर आरोपी घेऊन जायचे. स्कीमरमधील तांत्रिक तपशील बनावट एटीएममध्ये अपलोड केल्यानंतर कॅमेºयातील फुटेज तपासून ग्राहकाचा पिन नंबर मिळवला की, आरोपी ग्राहकाच्या खात्यातून पैसे काढून घ्यायचे. कॅमेरा आणि स्कीमर लावण्यासाठी सुरक्षारक्षक नसलेले एटीएम आरोपी हेरायचे.
आरोपींमध्ये मुंब्रा येथील हैदरअली शेरअली सारंग (वय २०), मुंबईतील डोंगरी चाळीतील सोहेल उमर शेख (वय ४४), याच भागातील मोहम्मद जैद फरीद रंगवाला (वय २९) आणि डोंगरी येथील तबस्सुम अबु बखर मेस्त्री ऊर्फ जान्हवी ऊर्फ ज्योत्स्ना (वय ३१) यांचा समावेश आहे. मोहम्मद जैद हा सॅण्डहर्स्ट स्टेशनजवळील व्होडाफोन गॅलरीमध्ये कामाला असून त्याने इतर ग्राहकांच्या ओळखपत्रांच्या आधारे मिळवलेले सीमकार्ड्स आरोपींना दिले होते. आरोपी एटीएममध्ये स्कीमर आणि कॅमेरा लावत असताना बाहेर लक्ष ठेवण्याचे काम तबस्सूम करायची. एका आरोपीने अशाच प्रकारचा गुन्हा यापूर्वी हैदराबादमध्येही केला होता, अशी माहिती पोलीस सहआयुक्त मधुकर पाण्डेय यांनी यावेळी दिली.