बँक संपामुळे एटीएममध्ये खडखडाट, ग्राहकांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:40 AM2021-03-16T04:40:35+5:302021-03-16T04:40:35+5:30
ठाणे : केंद्र सरकारने सरकारी बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केल्याच्या निषेधार्थ देशातील सरकारी बँकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी १५ आणि ...
ठाणे : केंद्र सरकारने सरकारी बँकांच्या खासगीकरणाची घोषणा केल्याच्या निषेधार्थ देशातील सरकारी बँकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांनी १५ आणि १६ मार्च (सोमवार, मंगळवार) रोजी संप पुकारला आहे. ठाणे जिल्ह्यातील बँक कर्मचारीही या संपात सहभागी झाले असून, सोमवारी या कर्मचाऱ्यांनी युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या वतीने प्रदेश सरचिटणीस नीलेश पवार यांच्या नेतृत्वाखाली ठाणे स्टेशन परिसरात मूक निदर्शने केली. संपकरी कर्मचाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट करणारी पत्रके स्टेशन परिसरात वाटली. शनिवार-रविवारला जोडून सोमवार व मंगळवारी बँका बंद राहणार असल्याने ग्राहकांची पंचाईत झाली आहे. अनेक एटीएममधील रोख रक्कम संपल्याने ग्राहकांना पैशाची चणचण जाणवत आहे.
ठाणे शहरातील बँका बंद आहेत. बंदची हाक देणाऱ्या युनायटेड फोरम ऑफ बँकिंग युनियनमध्ये ऑल इंडिया बँक एम्प्लॉइज असोसिएशन, नॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ बँक एम्प्लॉइज, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशन, ऑल इंडिया बँक ऑफिसर्स असोसिएशन, इंडियन नॅशनल बँक ऑफिसर्स काँग्रेस, इंडियन नॅशनल बँक एम्प्लॉइज फेडरेशन, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक वर्कर्स, नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ बँक ऑफिसर्स आणि बँक एम्प्लॉइज फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनांचा समावेश आहे.
सोमवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पवार यांच्या नेतृत्वाखाली तसेच स्टाफ युनियनचे सहचिटणीस दिलीप चव्हाण, ऑफिसर्स असोसिएशनच्या उपाध्यक्षा अरुणा अग्निहोत्री, विक्रम खराडे, सुबोध गायकवाड, प्रशांत देवस्थळी यांच्या उपस्थितीमध्ये मूक निदर्शने करण्यात आली.
यावेळ नीलेश पवार म्हणाले की, बँक कर्मचारी हे आंदोलन युनायटेड फोरम ऑफ बँकिंग युनियनच्या माध्यमातून करीत आहोत. या संपामध्ये देशभरातील सुमारे दहा लाख अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पीय भाषणात बँका आणि विमा कंपन्यांचे खासगीकरण करण्याचे धोरण जाहीर केले आहे. त्या विरोधात आम्ही हा बंद पुकारला आहे. राष्ट्रीय मालमत्ता असलेल्या जनतेच्या भांडवलास धक्का लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. खासगी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असून, पीएमसी हे त्याचे ज्वलंत उदाहरण आहे. सार्वजनिक बँकांमध्ये असे घोटाळे होत नाहीत. मात्र, ज्यांनी कर्जे रखडवली, त्यांनाच बँका विकण्याचे धोरण केंद्र सरकारने आखले आहे. त्या निषेधार्थ हा लढा उभारण्यात आला आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना स्वातंत्र्य दिले तर त्या देशाची अर्थव्यवस्था तारण्याचे काम करतील, असेही पवार म्हणाले.
..........