भिवंडीत एटीएम फोडून 10 लाखांची रोकड लंपास
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2018 05:12 PM2018-10-28T17:12:03+5:302018-10-28T17:21:28+5:30
भिवंडीतील अंजूरफाटा येथे रविवारी (28 ऑक्टोबर) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एटीएम फोडून ९ लाख ९० हजार सातशे रूपये चोरून नेल्याची घटना घडली आहे.
भिवंडी - भिवंडीतील अंजूरफाटा येथे रविवारी (28 ऑक्टोबर) पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एटीएम फोडून ९ लाख ९० हजार सातशे रूपये चोरून नेल्याची घटना घडली आहे. भिवंडी-वसई मार्गावरील अंजुरफाटा येथे चोवीस तास वाहनांची वर्दळ असते. तेथील शिवाजीनगर येथे रस्त्यावर युनियन बँकेचे एटीएम आहे. पहाटे चोरी करण्यास आलेल्या चोरट्यांनी एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळ्या रंगाचा स्प्रे मारला आणि गॅसकटरच्या मदतीने एटीएम मशीन तोडले.
चोरट्यांनी ९ लाख ९० हजार सातशे रुपयांची रक्कम लंपास करून पळ काढला. रविवारी सकाळी एटीएम सेंटर शेजारील किराणा दुकानदार तेथे गेल्यावर ही घटना उघडकीस आली. दुकानदाराने तातडीने या घटनेची माहिती नारपोली पोलीस ठाण्यात दिली. चोरीची माहिती मिळाल्यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश जाधवयांसह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी युनियन बँक ऑफ इंडियाचे एटीएम हे एजीएस या कंपनीचे असून त्यांचे कर्मचारी प्रशांत भट यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.