म्हारळ येथे एटीएम फाेडले, एक लाखांची राेकड लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:44 AM2021-09-06T04:44:59+5:302021-09-06T04:44:59+5:30
म्हारळ : कल्याण-मुरबाड महामार्गावरील म्हारळ येथे मध्यरात्री आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम फाेडून एक लाख रुपये लांबविले आहेत. तीन जणांनी हा ...
म्हारळ : कल्याण-मुरबाड महामार्गावरील म्हारळ येथे मध्यरात्री आयसीआयसीआय बँकेच्या एटीएम फाेडून एक लाख रुपये लांबविले आहेत. तीन जणांनी हा दराेडा घातला असून, त्यांनी पीपीई किट आणि सुरक्षारक्षकांचा पेहराव केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. त्या फुटेजद्वारे टिटवाळा पोलीस तपास करीत आहेत.
म्हारळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चाैकाजवळ विठ्ठलनगरच्या भरवस्तीत आयसीआयसीआय बॅंकेचे हे एटीएम आहे. तिघा चाेरट्यांनी मध्यरात्री हे एटीएम कटरच्या साहाय्याने फाेडून एक लाख रुपये चाेरी केले. एटीएमच्या मागे चाेरट्यांनी आणलेल्या बॅगा पाेलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. या चाेरीची माहिती मिळताच, सहायक पोलीस निरीक्षक दीपक भोई आणि आर.पी. पवार हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या परिसराची तपासणी केली. प्राथमिक माहितीनुसार, एक लाख रुपयांची राेकड चाेरीला गेल्याची माहिती टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू वंजारी यांनी ‘लोकमत’ला दिली.
दरोडा पडत असताना, ऑनलाइन सीस्टिममुळे सीसीटीव्हीत आयसीआयसीआय बँकेच्या कर्मचाऱ्यांना दरोडा पडत असल्याचे दिसत होते. त्यामुळे त्वरित पोलीस कंट्रोल रूमला कळविले होते. मात्र, घटनास्थळी पोलीस उशिरा पोहोचले. त्यामुळे दरोडेखोर पळून गेले. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेराही जाळला. याविषयी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वंजारी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना घटना कळली होती, असे त्यांनी सांगितले. मात्र, कंट्रोल रूमला फोन आल्याची पुष्टी केली नाही. कंट्राेल रूमने त्वरित म्हारळ पोलीस चौकीला कळविले असते, तर या दराेडेखाेरांना पकडता आले असते, अशी चर्चा सुरू आहे.