अत्रे रंगमंदिराची डागडुजी कागदावरच : पडदा उघडणार पुढच्या वर्षी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 05:37 AM2017-08-10T05:37:35+5:302017-08-10T05:37:35+5:30

देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी सध्या बंद असलेल्या आचार्य अत्रे रंगमंदिराच्या मुख्य कामाला अद्यापही प्रारंभ झालेला नाही. १ आॅक्टोबरला नाट्यगृह सुरू केले जाईल, असे सांगण्यात आले होते. परंतु, यासंदर्भात आजतागायत केवळ निविदा प्रक्रिया पार पडली आहे.

Atre theater repair paper: The screen will open next year | अत्रे रंगमंदिराची डागडुजी कागदावरच : पडदा उघडणार पुढच्या वर्षी

अत्रे रंगमंदिराची डागडुजी कागदावरच : पडदा उघडणार पुढच्या वर्षी

Next

- प्रशांत माने 
कल्याण : देखभाल-दुरुस्तीच्या कामासाठी सध्या बंद असलेल्या आचार्य अत्रे रंगमंदिराच्या मुख्य कामाला अद्यापही प्रारंभ झालेला नाही. १ आॅक्टोबरला नाट्यगृह सुरू केले जाईल, असे सांगण्यात आले होते. परंतु, यासंदर्भात आजतागायत केवळ निविदा प्रक्रिया पार पडली आहे; पण प्रत्यक्षात कामाला सुरुवात झालेली नाही. पालिकेतील अधिकारी आणि रंगभूमी क्षेत्रातील जाणकारांच्या म्हणण्यानुसार हे काम सुरू झाल्यावर त्याला किमान दोन ते तीन महिन्यांचा काळ लागेल. सध्या मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीत व्यस्त असलेला केडीएमसीचा अधिकारीवर्ग पाहता या नाट्यगृहाचे काम पूर्ण व्हायला डिसेंबरअखेर अथवा २०१८ साल उजाडण्याची दाट शक्यता आहे.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पार पडलेल्या नव्वदाव्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनापूर्वी ‘लोकमत’ने डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले कलामंदिराची दुरवस्था चव्हाट्यावर आणली होती आणि कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिराच्या स्थितीवर बोट ठेवले होते. त्यातच, या रंगमंदिरात प्रयोगावेळी फिरणारी मांजरे, एसी बंद पडल्याने नाट्यकलावंत-रसिकांत झालेला वाद आणि नंतर वेगवेगळ्या कलाकारांनी सोशल मीडियावर या रंगमंदिराच्या अवस्थेबाबत टाकलेले व्हिडीओ यामुळे खडबडून जाग आलेल्या केडीएमसी प्रशासनाने दुरुस्तीसाठी १ मार्चचा मुहूर्त काढला. तो हुकल्याने आजतागायत ‘तारीख पे तारीख’ पडत होती. प्रशासनाच्या चालढकलीमुळे तसेच निविदा प्रक्रियेला लागलेल्या विलंबामुळे दुरवस्था जैसे थे राहिली.
गेल्या वर्षी १४ एप्रिलला ‘ती फुलराणी’ या नाट्य प्रयोगादरम्यान वातानुकूलन यंत्रणा बंद पडल्याने नाट्य रसिकांसह कलाकारांना घामाच्या धारांचा सामना करावा लागला. उकाड्याने हैराण झालेल्या प्रेक्षकांनी नाट्यगृहात गोंधळ घालत पैसे परत देण्याची मागणी केल्याने व्यवस्थापनाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला. या धर्तीवर अत्रे रंगमंदिराच्या देखभाल-दुरुस्तीचे काम करण्याचा निर्णय झाला. मार्चचा मुहूर्त हुकल्यानंतर या दुरुस्तीच्या कामासाठी हे रंगमंदिर एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या काळात बंद ठेवण्याचे जाहीर करण्यात आले. मात्र, मुख्य कामांसाठी काढण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद न मिळाल्याने ही डेडलाइन सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली.
१ आॅक्टोबरला नाट्यगृह सुरू करण्यात येईल, असे सांगण्यात आले. पण, ही डेडलाइनही हुकणार आहे. तीन वेळा काढण्यात आलेल्या निविदेला दोन दिवसांपूर्वीच प्रशासनाकडून हिरवा कंदील दाखवण्यात आला. यानंतर, या निविदेचा प्रस्ताव स्थायी समितीच्या मंजुरीसाठी पाठवला जाईल. तसेच प्रशासनाच्या कार्यादेशानंतरच प्रत्यक्षात कामाला सुरुवात होईल. या प्रक्रियेलाही काही दिवसांचा अवधी लागण्याची शक्यता आहे.
दोन टप्प्यांत कामांची विभागणी करण्यात आली आहे. यात वातानुकूलन यंत्रे बसवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. परंतु, दुसºया टप्प्यातील प्रसाधनगृहांची दुरुस्ती, चेंबरचे काम, प्लम्बिंग, व्हीआयपी रूम, गच्चीवर शेड उभारणे, छताची दुरुस्ती, कार्पेट बदलणे आदी महत्त्वपूर्ण कामांना अद्यापही सुरुवात झालेली नाही.
निवडणूक व्यस्ततेचा फटका
भिवंडीपाठोपाठ आता मीरा-भार्इंदर महापालिका निवडणुकीच्या कामासाठी केडीएमसीचे तब्बल ४०० कर्मचारी मागवण्यात आले आहेत. २० आॅगस्टला मतदान होत असून २१ तारखेला मतमोजणी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आतापासूनच अभियंता आणि उपअभियंता यांना रूजू होण्याचे आदेश काढण्यात आले आहेत. अधिकारी या निवडणुकीत व्यस्त होणार असल्याने महापालिकेच्या अनेक विभागांतील कामे खोळंबणार आहेत. याचा फटका अत्रे रंगमंदिराच्या दुरुस्तीलाही बसेल.
‘वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न’
निविदा प्रक्रियेला विलंब लागला असला तरी वेळेत काम पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कामाला सुरुवात केल्यानंतर त्याची व्याप्ती कितपत आहे, यावर सर्व अवलंबून राहणार आहे. महापालिका सभागृहातील छत कोसळल्याची घटना पाहता नाट्यगृहाच्या छताचीही पाहणी केली जाणार आहे. लवकरात लवकर नाट्यगृह कसे सुरू करता येईल, यासाठी आमचा प्रयत्न असून कोणत्याही त्रुटी राहू नयेत, हे देखील पाहिले जाणार असल्याची प्रतिक्रिया शहरअभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ला दिली.

... तर देवगंधर्व डोंबिवलीत

डिसेंबरच्या दुसºया आठवड्यात कल्याण गायन समाजातर्फे अत्रे रंगमंदिरात देवगंधर्व महोत्सव होतो. डिसेंबर महिन्यात इंडियन मेडिकल असोसिएशनचा कार्यक्रम होतो. रंगमंदिर सुरू होण्यातील अनिश्चितता पाहता कार्यक्रम कोठे घ्यायचा, असा पेच आयोजकांसमोर पडला आहे.
यासंदर्भात कल्याण गायन समाज संस्थेचे सचिव महेश जोशी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अत्रे रंगमंदिर जर वेळेत सुरू होणार नसेल, तर डोंबिवलीमधील सावित्रीबाई फुले कलामंदिरात महोत्सव पार पडेल, असे ते म्हणाले.

Web Title: Atre theater repair paper: The screen will open next year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.