लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 12:34 AM2017-12-07T00:34:38+5:302017-12-07T00:34:47+5:30
लग्नाचे आमिष दाखवून ठाण्याच्या लोकमान्यनगर येथील एका २५ वर्षीय तरुणीवर तिचाच नातलग असलेल्या दीपक विश्वकर्मा (२८) याने पाच वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
ठाणे : लग्नाचे आमिष दाखवून ठाण्याच्या लोकमान्यनगर येथील एका २५ वर्षीय तरुणीवर तिचाच नातलग असलेल्या दीपक विश्वकर्मा (२८) याने पाच वर्षांपासून लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
पीडित तरुणी आणि दीपक हे दोघेही नातेवाईक असल्यामुळे त्यांची एकमेकांशी चांगली ओळख आहे. याच ओळखीतून तिने त्याच्यावर विश्वास ठेवला. ती मूळची उत्तर प्रदेशची आहे. तोही उत्तर प्रदेशातील सुलतानपूर जिल्ह्यातील सोहनी गावचा रहिवासी आहे. याच कारणामुळे त्यांची अधिक जवळीक झाली. याचा गैरफायदा घेत त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर २०१२ पासून नवी मुंबईतील दिघा येथील ईश्वरनगर, दिवा येथील त्याच्या घरी तसेच लोकमान्यनगर येथील तिच्या घरी आणि मुलुंड येथील एका लॉजवर अत्याचार केला. लग्नाचे नाव काढल्यानंतर तो वेगवेगळी कारणे सांगून लवकरच ते करणार असल्याचे तिला सांगायचा. पुढे शरीरसंबंध ठेवण्यासाठी तो धमकावत होता. कुठे वाच्यता केल्यास बदनामी करण्याचीही तिला तो धमकी देत होता. तरीही, तिने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावल्यानंतर मात्र तो ठाणे जिल्ह्यातून पसार झाला. अखेर, आपली मानसिक आणि शारीरिक फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर या तरुणीने ५ डिसेंबर रोजी वर्तकनगर पोलीस ठाण्यात दीपकविरुद्ध बलात्काराची तक्रार दाखल केली. आरोपी ठाण्यातून पसार झाला असून त्याचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.