माजी नगरसेवक मनोहर डुंबरेंविरुद्ध ॲट्राॅसिटीचा गुन्हा; जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप
By जितेंद्र कालेकर | Published: July 18, 2024 10:58 PM2024-07-18T22:58:16+5:302024-07-18T22:59:11+5:30
गैरकृत्याला विराेध करीत बाजूला केल्याच्या आकसातून खाेटा गुन्हा दाखल केल्याचा डुंबरेंचा दावा
जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: घर हडप करून जातिवाचक शिवीगाळ केल्याच्या आराेपाखाली भाजपचे माजी नगरसेवक मनोहर डुंबरे यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती पीडित तरुणीचे पती अशोक सोनावले यांनी पत्रकार परिषदेत गुरुवारी दिली.
डोंगरीपाडा, किंककाँगनगरातील फुफानी कंपाउंड येथे स्वप्नाली अशोक सोनावले यांचे घर आहे. हे घर त्यांनी भाडेतत्त्वावर दिले आहे. फेब्रुवारी २०२३ मध्ये भाडेकरूचा करारनामा संपल्यानंतर स्वप्नाली या घराचा ताबा घेण्यासाठी गेल्या. त्यावेळी संबंधित भाडेकरूने घराचा ताबा सोडण्यास नकार दिला. हे घर मनोहर डुंबरे यांनी दहा लाखांना विकल्याचाही दावा केला. यासंदर्भात भाडेकरूने डुंबरे यांच्याशी स्वप्नाली यांचे फोनवर बोलणे करून दिले. जुजबी बोलून डुंबरे यांनी फोन बंद केला. त्यामुळे स्वप्नाली यांनी पुन्हा डुंबरे यांना फोन केला असता, हे घर माझे आहे. तुम्ही कोण आहात? मी इथला नगरसेवक असून माझी मालकी आहे, असे म्हणत डुंबरे यांनी स्वप्नाली यांना जातिवाचक शिवीगाळ केल्याचा आराेप आहे. कासारवडवली पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यावर पोलिसांनी कारवाई न केल्याने स्वप्नाली यांनी न्यायालयात १५६ (३) नुसार याचिका दाखल केली. त्यावर ९ जुलै २०२४ रोजी ठाणे न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला. त्यानुसार १६ जुलै राेजी रात्री कासारवडवली पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ३ (अ), ३ (१)(४) आणि ३ (१) (९) नुसार गुन्हा दाखल केला. यावेळी अण्णाभाऊ साठे यांचे वंशज सचिन साठे, अशोक सोनावले, रमेश समुखराव आणि राजाभाई सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
............
आकसातून माझ्यावर खाेटा गुन्हा : मनाेहर डुंबरे
अशोक सोनावले हा माझा पूर्वीचा कार्यकर्ता होता. तो माझ्या नावाचा गैरवापर करून अनधिकृत बांधकाम करीत होता. माझ्या नावाने उधारीवर पैसे घेत होता. हे सर्व लक्षात आल्यावर त्याला बाजूला केले. याचाच राग धरून त्याने जातीचे कार्ड वापरून माझ्याविरोधात हा गुन्हा दाखल केला.
-मनाेहर डुंबरे, माजी नगरसेवक, ठाणे