उल्हासनगर महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2017 11:12 AM2017-11-17T11:12:21+5:302017-11-17T11:12:46+5:30
रिपाइं गटनेते भगवान भालेराव यांना उद्देशून जातीयवादी उद्गार काढल्याने महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदानंद नाईक/उल्हासनगर : रिपाइं गटनेते भगवान भालेराव यांना उद्देशून जातीयवादी उद्गार काढल्याने महापालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांच्यावर अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री उशीरा ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, निंबाळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यास दिरंगाई करणारे पोलीस उपायुक्त अंकित गोयल, सहाय्यक पोलीस आयुक्त विलास तोटावर, तपास अधिकारी अविनाश काळदाते यांच्यावरही गुन्हा दाखल होण्याची टांगती तलवार आहे.
उल्हासनगर पालिका आयुक्त राजेंद्र निंबाळकर यांनी कोणतीही पूर्व सूचना न देता, रिपाइं, भारिप, पीआरपी, काँग्रेस पक्ष गटनेत्यांच्या कॅबिन सीलबंद केले. एकूण नगरसेवकाच्या 10 टक्के नगरसेवक निवडून आले नसल्याचे कारण यावेळी आयुक्तांनी दिले. महापालिकेच्या परंपरेनुसार तत्कालीन आयुक्त सुधाकर शिंदे यांनी संबंधित पक्ष गटनेत्यांना कॅबिन देऊन, कर्मचारी व इतर सुविधा दिल्या. मात्र, पूर्व सूचना न देता केबिन सील का केलं? याचा जाब आयुक्त निंबाळकर यांना रिपाइं गटनेते भालेराव यांनी आयुक्तांना विचारला. यावेळी दोघात तूतू-मैंमैं झाली व आयुक्तांच्या तोंडून जातीवाचक शब्द निघाले.
रिपाइंचे शहराध्यक्ष व पक्ष गटनेते भगवान भालेराव यांच्यासह अनेकांनी पोलीस उपायुक्त अंकित गोयल यांच्यासह मध्यवर्ती पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन कारवाईचे निवेदन दिले. मात्र 5 महिने उलटूनही पालिका आयुक्त विरोधात गुन्हा दाखल केला नाही, या निषेधार्थ भालेराव यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. अखेर कल्याण सत्र विशेष न्यायालयाने महापालिका आयुक्त निंबाळकर यांच्याविरोधाकत अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला.