सचिन वाझे यांचा एटीएसला हवा आहे ताबा: सुनावणी ३० मार्चला होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 09:08 PM2021-03-19T21:08:30+5:302021-03-19T21:10:11+5:30
सचिन वाझे यांच्या कुटूंबियांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी ठाणे न्यायालयात केली. ती अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी मान्य केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: ठाण्यातील व्यापारी मनसुख हिरेन यांच्या कथित हत्येप्रकरणी मुंबईचे निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या अटकपूर्व अर्जाची सुनावणी ३० मार्चपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. दरम्यान, सचिन वाझे यांच्या कुटूंबियांना संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी ठाणेन्यायालयात केली. ती अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एस. तांबे यांनी मान्य केली.
सध्या मुंबईतील ‘अंटालिया’ इमारतीजवळ जिलेटिनच्या कांडया असलेली स्कॉर्पिओ मोटार मिळाल्याप्रकरणी वाझे यांना राष्टÑीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) पथकाने अटक केली आहे. त्याआधी त्यांनी ठाणे न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. याच अर्जाची सुनावणी १९ मार्च रोजी (शुक्रवारी) होणार होती. मात्र, त्याआधीच त्यांना एनआयएने ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना १३ मार्च रोजी रात्री पावणे १२ वाजताच्या दरम्यान अटकही केली. दरम्यान, स्फोटके मिळालेल्या मोटारकारचे मालक मनसुख हिरेन यांच्या कथित हत्येप्रकरणी राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ने आपले म्हणणे न्यायालयात सादर करावे, असे आदेश ठाणे न्यायालयाने दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर एटीएसने हिरेन यांच्या हत्या प्रकरणात आतापर्यंत काय तपास केला? तसेच त्यांच्या कुटूंबियांनी वाझे यांच्यावर व्यक्त केलेल्या आरोपांच्या अनुषंगाने केलेल्या तपासाची एटीएसने चार पानी अहवाल ठाणे न्यायालयात शुक्रवारी सादर केला. वाझे यांच्याकडे मनसुख हिरेन हत्या प्रकरणाची चौकशी बाकी आहे, त्याबाबतचे पुरावे गोळा करायचे आहेत, त्यासाठी त्यांचा ताबा देण्यात यावा, अशी मागणीही या अहवालाद्वारे करण्यात आली.
दरम्यान, साकेत सोसायटीमध्ये राहणाऱ्या वाझे कुटूंबियांना संरक्षण देण्यात यावे, प्रसारमाध्यमांकडूनही त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होऊ नये, अशी मागणी वाझे यांच्या बहिणीने केली. त्यावर वाझे कुटूंबियांना संरक्षण देण्याचे आदेश न्यायालयाने ठाणे पोलिसांना दिले. तसेच अटकपूर्व जामीन अर्जावरही ३० मार्च रोजी सुनावणी होणार आहे. जिल्हा सरकारी वकील हेमंत लोंढे यांनी एटीएसच्या बाजूने न्यायालयात तपासा बाबतचा अहवाल सादर केला.
‘सचिन वाझे यांच्या कुटूंबीयांना पोलीस संरक्षण देण्याबाबतचे ठाणे न्यायालयाचे आदेश अद्याप मिळालेले नाहीत. ते मिळाले की त्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.’
अविनाश अंबुरे, पोलीस उपायुक्त, ठाणे शहर