पूर्ववैमनस्यातून मसाला विक्रेत्यावर सहकाऱ्याचा खुनी हल्ला

By जितेंद्र कालेकर | Published: July 1, 2024 08:49 PM2024-07-01T20:49:30+5:302024-07-01T20:50:43+5:30

आरोपी अटकेत : गस्तीवरील पोलिसांनी लागलीच केले जेरबंद

attack by a colleague on a spice seller out of prior enmity | पूर्ववैमनस्यातून मसाला विक्रेत्यावर सहकाऱ्याचा खुनी हल्ला

पूर्ववैमनस्यातून मसाला विक्रेत्यावर सहकाऱ्याचा खुनी हल्ला

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील सागर नाना देशमुख (४०) या मसाला विक्रेत्यावर त्याच दुकानात पूर्वी काम करणाऱ्या हरिश्चंद्र गायकवाड (३०) या कर्मचाऱ्याने पूर्ववैमनस्यातून कोयत्याने खुनी हल्ला केल्याची घटना सोमवारी सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास घडली. आरडाओरडा ऐकून ठाणेनगर पोलिसांनी तत्काळ धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. नवीन कलमानुसार ठाणेनगर पोलिस ठाण्यात हा पहिलाच गंभीर गुन्हा दाखल झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

बदलापूर येथे राहणारे सागर नाना देशमुख (४०) हे ठाणे रेल्वे स्टेशन परिसरातील के. जी. वणगे या मसाला दुकानात नोकरी करतात. सोमवारी सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास ते ठाणे स्टेशनवर उतरून नेहमीप्रमाणे राघोबा शंकर रोडने कामावर जात होते. त्याचवेळी हरिश्चंद्र या त्यांच्या कामावरील पूर्वीच्या सहकाऱ्याने भर रस्त्यात गाठून त्यांच्यावर अचानक कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यात देशमुख यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. हल्लेखोर पुन्हा देशमुख यांच्यावर वार करण्यास पुढे सरसावला. मात्र देशमुख यांच्यासोबत असलेले सूचित शिंदे यांनी हल्लेखोरास पकडून ठेवले आणि मदतीसाठी आरडाओरडा केला. त्याचवेळी गस्तीसाठी जाणारे ठाणेनगर पोलिस ठाण्याच्या बीट क्रमांक एकचे पाेेलिस हवालदार अविनाश वाघचौरे यांनी आरडाओरडा ऐकल्याने त्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्यांनी या हल्लेखोरास तत्काळ ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. गंभीर जखमी झालेल्या देशमुख यांना उपचारासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. हल्लेखाेराचा देशमुख यांच्याशी कामावरून जुना वाद होता. याच रागातून त्याने हा हल्ला केल्याची माहिती वरिष्ठ पाेलिस निरीक्षक विजयकुमार देशमुख यांनी दिली.

नवीन कलमाखाली पहिला गंभीर गुन्हा दाखल-

या हल्ल्यात देशमुख यांच्यावर कोयत्याने वार झाल्याने ते गंभीर जखमी झाले. ठाणेनगर पोलिस ठाण्यात नवीन भारतीय न्यायसंहिता कलम ११८ (२), ३५१ (२) २०२३ नुसार (जुने कलम भारतीय दंड विधान - ३२६, ५०६ गंभीर दुखापत करणे) सह कलम ४, २५ भारतीय हत्यार कायद्याखाली गुन्हा दाखल केला. ठाणे परिमंडळ एकमध्ये नवीन कलमाखाली हा पहिलाच गंभीर गुन्हा दाखल झाला असून आरोपीला अटक केल्याची माहिती देशमुख यांनी दिली. याच पाेलिस ठाण्यात नवीन कायद्यातील कलम ३०३ (२) पूर्वीचा कलम ३७९ हा चाेरीचा पहिलाच गुन्हा इंद्रकुमार जैन यांनी दाखल केला. जैन यांचा साेमवारी बाजारपेठेतून ५० हजारांचा माेबाइल सकाळी १० वाजण्याच्या सुमारास चाेरीस गेला.
 

Web Title: attack by a colleague on a spice seller out of prior enmity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.