बसण्याच्या जागेवरून फेरीवाल्यावर हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 01:37 AM2019-10-16T01:37:30+5:302019-10-16T01:37:37+5:30
डोंबिवली पूर्वेतील घटना : कापडविक्रेता गंभीर जखमी, गुन्हा दाखल
डोंबिवली : पदपथ, रस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांमुळे नागरिक त्रस्त असतानाच या जागेवरून फेरीवाले एकमेकांच्या जीवावर उठल्याचे दिसत आहे. पूर्वेकडील रेल्वेस्थानकानजीक असलेल्या शिवसेना शाखेसमोर पदपथावर बसण्याच्या जागेवरून झालेल्या वादात सलाउद्दीन सिद्दीकी शेख याने जाफर अली इंद्रिसी यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. बेदम मारहाणीत इंद्रिसी गंभीर जखमी झाले असून सोमवारी दुपारी ४.३० वाजता ही घटना घडली. याप्रकरणी सलाउद्दीनवर रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रेल्वेस्थानक परिसरात १५० मीटर अंतरापर्यंत फेरीवाल्यांना व्यवसाय करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. केडीएमसीतील ‘फ’ प्रभाग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादामुळे १५० मीटर परिक्षेत्रात असणाºया स्कायवॉकवर फेरीवाले आणि भाजीविक्रेते दिवसाढवळ्या बिनदिक्कत ‘बाजार’ मांडत आहेत. याठिकाणीही बसण्याच्या जागेवरून शनिवारी दोघांत जुंपल्याचा प्रकार घडला होता.
डोंबिवली पूर्वेला सोमवारचा बाजार भरतो. यानिमित्त आठ ते दहा वर्षांपासून कुर्ला येथे राहणारे जाफर अली हे याठिकाणी कपडेविक्रीसाठी येतात. सोमवारी ते आले असता बसण्याच्या जागेवरून अन्य कपडेविक्रेता सलाउद्दीन शेख याने अली यांच्याशी वाद घातला. यानंतर, शेख याने हल्ला करत अली यांना लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली. तसेच जवळ असलेल्या फरशीने अली यांच्या डोक्यावर, कपाळावर आणि छातीवर प्रहार केला. यात अली हे गंभीर जखमी झाले. अन्य फेरीवाले अली यांच्या मदतीला धावले आणि सलाउद्दीनच्या मारहाणीतून त्यांची सुटका केली.
गंभीर जखमी झालेल्या अली यांना प्रारंभी केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले होते. पण, त्यांना जादा मार लागल्याने तसेच मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल केले. सध्या ते बेशुद्धावस्थेत असून सलाउद्दीन मारहाणीच्या घटनेनंतर पसार झाला आहे. याप्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीवरून रामनगर पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
परप्रांतीय फेरीवाल्यांची दादागिरी
फेरीवाला अतिक्रमणाचा मुद्दा नेहमीच वादाचा राहिला असताना दुसरीकडे परप्रांतीय फेरीवाल्यांची दादागिरी सोमवारच्या घटनेतून उघड झाली. मुंब्रा व अन्य भागांतून मोठ्या प्रमाणावर फेरीवाले व्यवसायासाठी कल्याण-डोंबिवलीत येतात. यातील बहुतांश गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. त्यांच्याकडून नेहमीच स्थानिक फेरीवाल्यांना धमकावण्याचे प्रकार सुरू असतात. सलाउद्दीन शेख हा वांद्रा तर गंभीर जखमी झालेले जाफर अली कुर्ला येथील रहिवासी आहेत.
पथक रमले गप्पांमध्ये
फेरीवाल्यांवरील कारवाईचा विषय येतो, तेव्हा निवडणूक कामात व्यग्र असल्याचे कारण फेरीवालाविरोधी पथकातील अधिकारी, कर्मचारी देतात. पण, सोमवारी सायंकाळी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. ते गप्पांमध्ये रमल्याने फेरीवाल्यांचे अतिक्रमण मनाई केलेल्या हद्दीतील पूर्वेतील उर्सेकरवाडीमध्ये पाहायला मिळाले. आता जीवघेण्या हल्ल्यानंतर तरी प्रशासनाला जाग येणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.