पवारांच्या घरावरील हल्ला ही चूकच, पण सरकारने एसटी कामगारांचे शोषण केले: प्रकाश आंबेडकर

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 05:30 AM2022-04-12T05:30:19+5:302022-04-12T05:30:45+5:30

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने एसटी कामगारांचे शोषण केले. न्यायालयात एसटी कामगारांची बाजू नीट मांडली गेली नाही.

Attack on Pawars house is wrong but government exploited ST workers says Prakash Ambedkar | पवारांच्या घरावरील हल्ला ही चूकच, पण सरकारने एसटी कामगारांचे शोषण केले: प्रकाश आंबेडकर

पवारांच्या घरावरील हल्ला ही चूकच, पण सरकारने एसटी कामगारांचे शोषण केले: प्रकाश आंबेडकर

Next

ठाणे :  

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने एसटी कामगारांचे शोषण केले. न्यायालयात एसटी कामगारांची बाजू नीट मांडली गेली नाही. शरद पवार यांच्या घरावर झालेला हल्ला चूक आहे, पण पवार हे सत्तेत नसले तरी त्यांचा पक्ष सत्तेत आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षाच्या मंत्र्यांनी याचा गांभीर्याने विचार करावा, असा टोला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी ठाण्यातील कार्यक्रमात लगावला. एसटी कामगारांची अवस्था गिरणी कामगारांसारखी होण्यापेक्षा त्यांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

ठाणे ओबीसी एकीकरण समितीच्या वतीने राष्ट्रपिता जोतिराव फुले जयंती महोत्सवाचे आयोजन गडकरी रंगायतन नाट्यगृहात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. आंबेडकर म्हणाले की, जेव्हा एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला तेव्हा आम्ही त्यांना पाठिंबा दिला होता. मात्र, तेव्हाच भूमिका मांडली होती की, तुमचा गिरणी कामगार होऊ देऊ नका, आता कोर्टाने संधी दिली आहे. उर्वरित प्रश्न नंतर सोडवता येतील मात्र आता कामावर रुजू व्हा. शिवनेरीच्या मार्फत ज्यावेळी खासगीकरण झाले तेव्हाच लढा द्यायला हवा होता. मात्र, संपाबाबत जर कोर्टात योग्य बाजू मांडली असती तर कोर्टाने आणखी अभय दिले असते, असे आंबेडकर म्हणाले. राज्य मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांना एसटीचे खासगीकरण हवे असल्याचा आराेपही त्यांनी केला. 

सदावर्तेंवरही टीका
वकिलांनी केवळ कोर्टात आपली बाजू मांडायची असते, रस्त्यावर बाजू मांडायची नसते, नेते, वकील अशा दोन्ही भूमिका एकाच वेळी निभावता येत नसल्याची टीका त्यांनी गुणवंत सदावर्ते यांचे नाव न घेता केली.

बेरोजगारी, महागाई लपवण्यासाठी दंगली 
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या काळात एवढी महागाई वाढली नव्हती. पेट्रोल, डिझेलचे दरही ८० रुपयांच्या वर गेले नव्हते. मात्र, आजच्या घडीला महागाई बोकाळली असून, त्याकडील लक्ष विचलित करण्याकरिता हिंदू-मुस्लिम दंगली घडवल्या जात असल्याचा आमचा संशय असल्याचे त्यांनी सांगितले. 

Web Title: Attack on Pawars house is wrong but government exploited ST workers says Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.