दारुसाठी पैसे न दिल्याने रिक्षाचालकावर हल्ला : आरोपी पसार
By जितेंद्र कालेकर | Published: February 8, 2023 08:26 PM2023-02-08T20:26:39+5:302023-02-08T20:26:47+5:30
कोपरी पोलिस ठाण्यात गुन्हा : ठार मारण्याचीही दिली धमकी
ठाणे : दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने बाळू घोरपडे (३५, रा. तुळशीधा, धर्मवीरनगर, ठाणे) या रिक्षाचालकावर सागर उर्फ गोटू चव्हाण (३५, रा. शांतीनगर, कोपरी, ठाणे) याने लोखंडी वस्तूने डोके, कपाळ आणि तोंडावर हल्ला केल्याची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास घडली. या हल्ल्यानंतर सागरने घोरपडे यांच्या खिशातील १२ हजारांची रोकड जबरीने चोरली. जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती कोपरी पोलिसांनी दिली.
घोरपडे हे ८ फेब्रुवारी रोजी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक दहाच्या बाहेर, रस्त्यावर प्रवाशांची वाट पाहत रिक्षामध्ये बसले होते. त्याचवेळी त्यांच्याच ओळखीचा सागर याने त्यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली. त्यास त्यांनी नकार दिला. यातून त्यांच्यात वाद झाल्यानंतर सागरने त्यांना शिवीगाळ करीत ठार मारण्याची धमकी दिली.
शिवाय, त्यांच्याकडील १२ हजारांची रोकड जबरीने हिसकावण्यासाठी त्यांच्या डोके, कपाळ आणि तोंडावर लोखंडी वस्तूने प्रहार करून जखमी केले. त्यानंतर त्यांच्या पॅन्टच्या खिशातील १२ हजारांची रोकड काढून घेतली. भांडणात मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या त्यांच्या मित्रांच्या अंगावर धावून जात त्यांनाही ठार मारण्याची धमकी दिली. ८ फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास जबरी चोरी, मारहाण, धमकी देणे आणि शिवीगाळ केल्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल झाला.