पालिकेच्या पथकावर फेरीवाल्यांचा हल्ला, शिवीगाळ, मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2019 01:45 AM2019-06-26T01:45:14+5:302019-06-26T01:45:37+5:30
अंबरनाथ नगरपरिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या वतीने मंगळवारी शिवाजी चौकात फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येत असताना काही वडापाव आणि डोसा विक्रत्यांनी कारवाईला विरोध करीत पथकावर हल्ला चढवला.
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या वतीने मंगळवारी शिवाजी चौकात फेरीवाल्यांच्या विरोधात कारवाई करण्यात येत असताना काही वडापाव आणि डोसा विक्रत्यांनी कारवाईला विरोध करीत पथकावर हल्ला चढवला. त्यात काही महिला फेरीवाल्यांचाही समावेश आहे. सुरक्षा रक्षकांवर आणि कामगारांवर धावून गेलेल्या फेरीवाल्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिवाजी चौकात कारवाई सुरु असताना काही फेरीवाल्यांनी हातगाड्या व टेबल उचलण्यास विरोध केला. तसेच कारवाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या अंगावर ते धावून गेले. एका महिला फेरीवाल्याने चक्क कर्मचाºयांना शिवीगाळ करीत कारवाई करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला. जप्त केलेल्या गाड्या पुन्हा खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. एका डोसा विक्रत्याने दांडके कर्मचाºयांवर उगारत हातगाडी उचलण्यास विरोध दर्शविला. फेरीवाले अंगावर धावून येत असल्याने व थेट मारण्याची भीती घालत असल्याने कर्मचारी अस्वस्थ झाले होते. तरीही कारवाई सुरुच राहिल्याने काही फेरीवाल्यांनी सुरक्षा रक्षक आणि कर्मचाºयांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारानंतर संबंधित फेरीवाल्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांची बघ्याची भूमिका
शिवाजी महाराज चौकात जेथे फेरीवाले बसतात तेथेच पोलीस चौकी आहे. तरीही त्यांच्यावर पोलीस कारवाई करीत नाही. मंगळवारी कारवाईवेळी दोन पोलीस कर्मचारी असतानाही त्यांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली. पोलीस त्यांना संरक्षण देत असल्याचे बोलले जात आहे.