वर्दीवर पुन्हा हात ! उल्हासनगरमध्ये वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ व धक्काबुक्की
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2017 11:54 AM2017-12-02T11:54:11+5:302017-12-02T15:58:04+5:30
रेल्वे स्टेशन परिसरात गाडी टोईंग करताना दोन तरुणांनी वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ व धक्काबुक्की केली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
उल्हासनगर : रेल्वे स्टेशन परिसरात गाडी टोईंग करताना दोन तरुणांनी वाहतूक पोलीस अधिकाऱ्याला शिवीगाळ व धक्काबुक्की केली. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. उल्हासनगर कॅम्प क्रमांक 4 परिसरातील रेल्वे स्थानक परिसरात रस्त्यावर व वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या गाड्या टोईंग व्हॅनवरील कर्मचारी शुक्रवारी (1 डिसेंबर) संध्याकाळी 5 वाजता उचलत होते. त्यावेळी विशाल आढाव, गणेश लष्करे व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सुळ यांच्यात तूतू-मैंमैं झाली. तरुणांनी पोलीस अधिकारी सूळ यांना शिवीगाळ व धक्काबुक्की दिल्याने स्टेशन परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. याप्रकरणी तरुणांविरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.
शहर वाहतूक पोलिसांनी रेल्वे स्टेशन पूर्व परिसराचा दोन दिवसांपूर्वी आढावा घेऊन पार्किंगबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानंतरही शुक्रवारी काही गाड्या रस्त्यावर व बाजूला वाहतूक कोंडी होईल,अशा ठिकाणी पार्क करण्यात आल्या होत्या. रस्त्याच्या बाजूला विशाल व गणेश यांनी लावलेली बाईक पोलीस टोईंग पथकाने उचलली. त्यावेळी विशाल आणि गणेश या दोन तरुणांनी उचलेली गाडी जबरदस्तीने खाली ओढून घेतली. यावेळी टोईंग व्हॅनवर उपस्थित असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय सुळ यांनी गाडीला जॅमर लावण्याचा प्रयत्न केला.
मात्र याचा राग तरुणांना आला व त्यांनी पोलीस अधिकारी सुळ यांच्या अंगावर धावून जात शिवीगाळ केली. तसंच 'आता तुझी वाट लावतो, तुमची औकात काय आहे?' अशी अपमानजनक वक्तव्य केली. यानंतर वाहतूक पोलिसांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याला फोन करून सर्व प्रकार सांगितला. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.