सैन्य दलातील जवानाकडून हल्ला, आईसमोरच तिघांनी अवजड हत्यार, दांडक्याने केली मारहाण

By संदीप वानखेडे | Published: May 19, 2024 11:03 PM2024-05-19T23:03:00+5:302024-05-19T23:06:33+5:30

Kolhapur Crime News: पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथे निटवडे रोडवर पूर्ववैमनस्यातून सैन्य दलातील जवानाने दांडक्याने आणि अवजड हत्याराने मारहाण करून विकास आनंदा पाटील (वय ४०, रा. पोर्ले तर्फ ठाणे) याचा खून केला. रविवारी (दि. १९) सायंकाळी सातच्या सुमारास शेतातील वस्तीवरून जनावरांच्या धारा काढून घरी जाताना विकास याच्या आईसमोरच खुनी हल्ल्याची घटना घडली.

Attacked by army jawan, beaten up with heavy weapons and sticks by three people in front of mother | सैन्य दलातील जवानाकडून हल्ला, आईसमोरच तिघांनी अवजड हत्यार, दांडक्याने केली मारहाण

सैन्य दलातील जवानाकडून हल्ला, आईसमोरच तिघांनी अवजड हत्यार, दांडक्याने केली मारहाण

कोल्हापूर पोर्ल तर्फ ठाणे : पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथे निटवडे रोडवर पूर्ववैमनस्यातून सैन्य दलातील जवानाने दांडक्याने आणि अवजड हत्याराने मारहाण करून विकास आनंदा पाटील (वय ४०, रा. पोर्ले तर्फ ठाणे) याचा खून केला. रविवारी (दि. १९) सायंकाळी सातच्या सुमारास शेतातील वस्तीवरून जनावरांच्या धारा काढून घरी जाताना विकास याच्या आईसमोरच खुनी हल्ल्याची घटना घडली. हल्लेखोर युवराज शिवाजी गायकवाड (वय ४०, रा. पोर्ले तर्फ ठाणे) याच्यासह अनोळखी दोघे घटनास्थळावरून पसार झाले.

घटनास्थळ आणि सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, सैन्य दलात पंजाबमध्ये कार्यरत असणारा युवराज गायकवाड आणि पोर्ले तर्फ ठाणे येथे शेती करणारा विकास पाटील या दोघांमध्ये वाद होता. फेब्रुवारी महिन्यात दोघांमध्ये हाणामारी झाली होती. त्यानंतर ड्यूटीवर गेलेला युवराज शनिवारी रात्रीच सुटीवर गावी आला होता. रविवारी सायंकाळी शेतातील कामे आणि जनावरांच्या धारा काढून विकास आईला दुचाकीवर घेऊन घरी निघाला होता. निटवडे रोडवर कमानीजवळ वाटेत थांबलेला युवराज आणि अनोखळी दोघांनी विकासची दुचाकी अडवली. खाली पाडून त्याच्यावर काठी आणि अवजड हत्याराने हल्ला चढवला. अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आईला ढकलून हल्लेखोरांनी विकासला बेदम मारहाण केली. परिसरातील ग्रामस्थांची गर्दी वाढताच हल्लेखोरांनी कारमधून पलायन केले. गंभीर जखमी अवस्थेतील विकास याला त्याचे मित्र विश्वास पाटील आणि विकास भोपळे या दोघांनी दुचाकीवरून सीपीआरमध्ये दाखल केले. काही वेळातच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. विकास याचा मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाईक आणि मित्रांनी सीपीआरच्या अपघात विभागासमोर गर्दी केली. दरम्यान, पन्हाळा पोलिसांनी घटनास्थळी आणि सीपीआरमध्ये पोहोचून माहिती घेतली. रात्री उशिरा याबाबत पन्हाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते


कट रचून हल्ला
तीन महिन्यांपूर्वी झालेल्या वादानंतर युवराज याने कट रचून विकासचा काटा काढल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू होती. हल्ल्यानंतर युवराज गायकवाड याच्यासह दोन साथीदारांनी पलायन केले. अन्य दोघांनी तोंडाला मास्क लावले होते. त्यामुळे त्यांची ओळख पटली नाही. हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांच्या अटकेसाठी पथक रवाना झाल्याची माहिती पन्हाळा पोलिसांनी दिली.

Web Title: Attacked by army jawan, beaten up with heavy weapons and sticks by three people in front of mother

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.