जाब विचारला म्हणून पत्र्याच्या बादलीने हल्ला; चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2024 03:12 PM2024-01-03T15:12:29+5:302024-01-03T15:12:39+5:30
या प्रकरणी रणजीत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती चितळसर पोलिसांनी मंगळवारी दिली.
ठाणे : मुलाशी झालेल्या वादाचा जाब विचारल्याने किरण चौहान (३८, रा.भुवाल चाळ, कापूरबावडी, ठाणे) यांच्यावर रणजीत कुमार याने वाद घालून पत्र्याच्या बादलीने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी रणजीत याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती चितळसर पोलिसांनी मंगळवारी दिली.
चौहान यांचा मुलगा अजय (वय १५) हा ३१ डिसेंबर, २०२३ रोजी दुपारी १२:३० वाजता त्याच्या मित्रांसह कापूरबावडी परिसरात खेळत होता. त्याच वेळी त्यांच्या घराशेजारी राहणाऱ्या रणजीत याने अजयला घरासमोर खेळण्यास विरोध केला. त्यातून या दोघांमध्ये वाद झाला आणि रणजीत कुमार याने अजयला चापटीने मारहाण केली.
वाद घालून केले जखमी
या प्रकरणी रणजीत कुमारविरुद्ध चितळसर पोलिस ठाण्यात तक्रारही केली. याच वादाची विचारणा करण्यासाठी रणजीतच्या घरी अजयची आई किरण या त्याला जाब विचारण्यासाठी गेली. तेव्हा रणजीतने त्यांच्याशीही वाद घालून त्या ठिकाणी असलेल्या पत्र्याची बादली त्यांच्या डोक्यात मारली. यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी रणजीत विरुद्ध चौहान यांनी १ जानेवारी, २०२४ रोजी तक्रार दिली आहे.