ठाण्यात अतिक्रमण विरोधी पथकावर फेरीवाल्यांचा हल्ला
By admin | Published: July 4, 2017 10:28 PM2017-07-04T22:28:13+5:302017-07-04T22:28:13+5:30
रामचंद्रनगर, वैतीवाडी परिसरातील फेरीवाल्यांनी ठाणे महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकातील चौघांवर हल्ला केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली.
ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि.04 - रामचंद्रनगर, वैतीवाडी परिसरातील फेरीवाल्यांनी ठाणे महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकातील चौघांवर हल्ला केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. नयन राठोड या अधिकाऱ्यासह रुपेश पांडे, हाफीज शेख आणि बाळा बोरसे या जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत असून हल्ला करणाऱ्या चंद्रिका तिवारी, संतोष तिवारी आणि संदीप तिवारी या तिघांना अटक केल्याची माहिती वागळे इस्टेट पोलिसांनी दिली.
सायंकाळी ४.३० ते ५ वाजण्याच्या सुमारास पालिकेच्या लोकमान्यनगर प्रभाग समितीमधील अतिक्रमण विरोधी पथकातील नयन राठोड हे आपल्या काही कर्मचाऱ्यांसह रामचंद्रनगर येथील अनधिकृत फलकांवर कारवाईसाठी गेले होते. त्यावेळी तिथे रस्त्यामध्ये अडथळा ठरणाऱ्या फेरीवाल्यांना त्यांनी बाजूला होण्यास सांगितले. मात्र, त्यांनी तिथून जाण्याऐवजी या पथकाशी हुज्जत घातली. यातून झालेल्या वादावादीतून त्यांनी पथकावर हल्ला केला. पोलीस बंदोबस्ताशिवाय हे पथक कारवाई करीत असल्यामुळे ते फेरीवाल्यांपुढे हतबल ठरले. यात जखमी झालेल्या राठोड यांच्यासह चौघांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे; तर हल्ला करणाऱ्या चौघांपैकी तिघांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविकांत मालेकर, निरीक्षक अनघा देशपांडे यांच्या पथकाने अटक केली. त्यांचा चौथा साथीदार बाळू उतेकर पसार झाला आहे.
अनेक फेरीवाल्यांवर कारवाई...
फेरीवाल्यांच्या हल्ल्यात चार कर्मचारी जखमी झाल्यानंतर तासाभराने पोलीस बंदोबस्तामध्ये आलेल्या पालिकेच्या दुसऱ्या पथकाने अनेक फेरीवाल्यांवर कारवाई केली.
दोन महिन्यात दुसऱ्यांदा हल्ला...
ठाणे रेल्वे स्थानक परिसरातील गावदेवी मंदीराजवळील फेरीवाले आणि दुकानाबाहेर सामान ठेवणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईसाठी गेलेल्या उपायुक्त संदीप माळवी यांच्यावर काही फेरीवाले आणि काही गाळे धारकांनी हल्ला केला होता. त्यात माळवी जबर जखमी झाले होते. त्यांच्यावरील या हल्ल्यानंतर पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी कारवाई अधिक तीव्र करीत फेरीवाले आणि रिक्षा चालक तसेच काही व्यापाऱ्यांवरही पोलीस बंदोबस्तामध्ये कारवाई केली होती. आयुक्तांच्या कारवाईचे पडसाद पालिकेच्या महासभेतही उमटले होते.