महापालिका प्रशासन कमकुवत असल्याने अधिकाऱ्यांवर हल्ले - जितेंद्र आव्हाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:42 AM2021-09-03T04:42:29+5:302021-09-03T04:42:29+5:30
ठाणे : ठाणे महापालिका प्रशासन कमकुवत असल्यानेच फेरीवाले अधिकाऱ्यांवर हल्ले करण्याची हिंमत करू शकतात, असा आरोप राज्याचे गृहनिर्माणमंत्री ...
ठाणे : ठाणे महापालिका प्रशासन कमकुवत असल्यानेच फेरीवाले अधिकाऱ्यांवर हल्ले करण्याची हिंमत करू शकतात, असा आरोप राज्याचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी केला. अशा फेरीवाल्यांकडे जाऊन खरेदी करणाऱ्या नागरिकांनीदेखील याचा विचार करायला हवा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर फेरीवाल्याने केलेला हल्ला दुर्दैवी असून, केवळ आईवडिलांच्या आशीर्वादामुळे त्या बचावल्या. ही घटना ठाण्याला भूषणावह नसल्याचेही त्यांनी सांगितले.
कासारवडवली येथे सोमवारी सायंकाळी पिंपळे यांच्या जीवघेणा हल्ला झाला. यात त्यांच्या हाताची दोन बोटे तुटली असून, त्यांचा सुरक्षारक्षक पालवे याचेही एक बोट कापले गेले आहे. त्यांच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, ठाण्यातील आमदार व राजकीय नेते मंडळींसह विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या पाठोपाठ बुधवारी रात्री डॉ. आव्हाड यांनीही रुग्णालयात भेट घेतली. यावेळी आव्हाड म्हणाले की, एवढी मुजोरी कुणाचीही चालू देता कामा नये. प्रशासनापेक्षा कोणी मोठा आहे, अशी भावना जेव्हा निर्माण होते, तेव्हा ते प्रशासन कमकुवत असते, याकडे आव्हाड यांनी महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. प्रशासनाचा दरारा पाहिजे, ज्यावेळी तो संपतो त्यावेळी अशा घटना घडतात, अशी टीका त्यांनी प्रशासनावर केली. एकीकडे फेरीवाल्यांविरोधात ओरडणारे ठाणेकर स्वत:च या फेरीवाल्यांकडे रांगा लावून उभे असतात. केवळ महापालिकेला जबाबदार न धरता, समाजाचीही तितकीच जबाबदारी असल्याचे आव्हाड यावेळी म्हणाले. या भेटीदरम्यान आव्हाड यांच्यासोबत माजी नगरसेवक अमित सरय्या आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.