अधिकाऱ्यांवरील हल्ले खपवून घेणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:26 AM2021-09-02T05:26:13+5:302021-09-02T05:26:13+5:30
ठाणे : कर्तव्यावर असतांना साहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री ...
ठाणे : कर्तव्यावर असतांना साहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रात्री उशिरा त्यांची भेट घेऊन अधिकाऱ्यांवर होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा दिला आहे. कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला करणाऱ्या हल्लेखोरावर कडक कारवाई करण्याचे आदेशदेखील त्यांनी दिले आहेत.
सोमवारी संध्याकाळी कासारवडवली भागातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी पिंपळे गेलेल्या असताना तिथे आलेल्या अमरजीत यादव या फेरीवल्याने त्यांच्यावर अचानक चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांची दोन बोटे तर त्यांच्या अंगरक्षकाचे एक बोट तुटले. त्यांचा उपचाराचा सर्व खर्च महानगरपालिकेतर्फे केला जाईल, याबाबत शिंदे यांनी आश्वस्त केले. अधिकाऱ्यांवर त्यातही महिला अधिकाऱ्यावर हल्ला होण्याची अशी ही शहरातील पहिलीच घटना असून ती अतिशय निंदनीय असल्याचे ते म्हणाले. अधिकाऱ्यांवर अशाप्रकारे होणारे हल्ले कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतले जाणार नसून या प्रकरणातील दोषी फेरीवाल्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना दिले असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाणे महानगरपालिकेने गेल्या काही दिवसांपासून शहरातील फेरीवाल्यांविरोधात धडक कारवाई सुरू केली असून त्या कारवाईला खीळ बसावी यासाठी उद्विग्नतेतून अशी घटना घडली असल्याची शक्यता आहे. मात्र, असे असले तरीही ही कारवाई मागे न घेता यापुढेही अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई सुरूच ठेवणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.