ठाण्यात पहाटेच्या सुमारास एटीएम फोडण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 10:22 PM2018-08-20T22:22:06+5:302018-08-20T22:27:51+5:30
ठाण्याच्या नौपाडा भागातील एका एटीएम केंद्रावर सुरक्षा रक्षकच नसल्याचा गैरफायदा घेऊन चोरटयांनी ते फोडून चोरीचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी पहाटेच्या सुमारास घडली.
ठाणे : येथील गडकरी रंगायतनपासून जवळच असलेले ‘स्टेट बँक आॅफ इंडिया’ या बँकेचे एटीएम फोडून चोरीचा प्रयत्न सोमवारी पहाटेच्या सुमारास झाला. ‘एटीएम’मधून पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका सुरक्षारक्षकाच्या लक्षात हा प्रकार आल्यानंतर त्याने नौपाडा पोलिसांना ही माहिती दिली.
नौपाड्यातील हे ‘एटीएम’ केंद्र पहाटे १.१५ वाजण्याच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ प्रयत्न करूनही चोरट्यांना ‘एटीएम’ फोडता न आल्याने त्यांनी तिथून पलायन केले. काही वेळाने पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास एका हॉटेलमधील एक सुरक्षारक्षक तिथे पैसे काढण्यासाठी गेला. त्यावेळी त्याच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्याने त्याचवेळी नौपाडा पोलीस ठाण्यातील गस्तीवरील पोलीस उपनिरीक्षक शिरीष यादव यांना ही बाब सांगितली. या ‘एटीएम’ केंद्राजवळ कोणताही सुरक्षारक्षक नसल्याचे आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. एटीएमच्या जवळपास असलेल्या ‘सीसीटीव्ही’ फुटेजच्या आधारे चोरीचा प्रयत्न करणाऱ्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. नौपाडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी चोरीचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. उपनिरीक्षक अजय गंगावणे हे अधिक तपास करत आहेत.
* सुरक्षारक्षक नाही...
पहाटे ज्यावेळी नौपाडा पोलिसांकडून बँकेच्या अधिकाºयांना एटीएमचोरीच्या प्रयत्नाबद्दल सांगण्यात आले. त्यावेळी सुरक्षारक्षकाच्या नेमणुकीचीही विचारणा पोलिसांनी केली. त्यावेळी रात्रीच्या वेळी सुरक्षारक्षक नेमण्याचे बँकेच्या तरतुदीमध्ये नसल्याची धक्कादायक बाब एका अधिकाºयाने सांगितल्याने पोलीसही अवाक झाले.