जव्हार इथं एसटी कर्मचाऱ्याचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न; रुग्णालयात उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2021 09:45 PM2021-11-13T21:45:20+5:302021-11-13T21:45:38+5:30
ST Strike: बस आगारातील तरुण वाहक दीपक खोरगडे वय वर्षे 30 या बस कंडक्टर (वाहक) याने शनिवारी सायंकाळी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे.
हुसेन मेमन
जव्हार – गेल्या काही दिवसांपासून राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु असून राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करण्याची आग्रही मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. दिवाळीपासून कर्मचाऱ्यांनी संप पुकारला असून अद्यापही संपावर तोडगा काढण्यात आला नाही. मात्र आतापर्यंत ३७ हून अधिक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली असून संप मिटावा यासाठी प्रशासकीय पातळीवर बैठका सुरु आहेत.
बस आगारातील तरुण वाहक दीपक खोरगडे वय वर्षे 30 या बस कंडक्टर (वाहक) याने शनिवारी सायंकाळी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याच्यावर जव्हार कुटीर रूग्णालयात उपचार सुरू आहे, दरम्यान प्रकृती चिंताजनक असल्यामुळे पुढील उपचारासाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवले जाणार असल्याची माहिती वैद्यकीय विभागाने दिली.
दरम्यान एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण होणार नाही असे परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितले असून सध्या हे प्रकरण कोर्टात आहे. जोपर्यंत समितीचा अहवाल येत नाही तोवर कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही असं सांगण्यात आलं आहे. त्यातच आहे त्या पगारात सुखी राहा असे खासदार संजय राऊत यांनी सांगितले, हे ऐकताच मानसिक स्थिती बिघडल्याने आत्महत्याचा प्रयत्न केला, असे जबाब पीडित रुग्णाने जव्हार पोलिसांना दिला आहे.