वाहतूक शाखेच्या पोलीस हवालदारावर गाडी नेण्याचा प्रयत्न: ठाण्यात वकीलाच्या मुलाला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 09:01 PM2018-12-09T21:01:39+5:302018-12-09T21:39:02+5:30
लायसन्स नाही, असते तर दिले असते, आई वकील असल्याने पोलीस काही करु शकत, अशी अरेरावीची भाषा करीत वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांवरच गाडी घालण्याचा प्रयत्न करुन पळून जाणाऱ्या आदित्य फड (१८) या वकील पुत्राला नौपाडा पोलिसांनी रविवारी सायंकाळी अटक केली आहे.
ठाणे: सिग्नल तोडून वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलीस कॉन्स्टेबल अजित खैरमोडे यांच्या अंगावर गाडी नेण्याचा प्रयत्न करणा-या आदित्य एकनाथ फड (१८) या तरुणाला नौपाडा पोलिसांनी रविवारी सायंकाळी अटक केली आहे. ठाण्याच्या माजी जिल्हा सरकारी वकील संगीता फड यांचा तो मुलगा आहे.
मल्हार सिनेमाकडून तीन हात नाक्याच्या दिशेने आदित्य ९ डिसेंबर रोजी दुपारी १.३० वा. च्या सुमारास सिग्नल तोडून त्याच्या काळी फिल्म असलेल्या कारने येत होता. नाशिक मुंबई वाहिनीवरील सिग्नल तोडल्यानंतर त्याची कार हरिनिवासकडे येणा-या सिग्नलकडे थांबली.
त्यावेळी त्याच्याकडे नौपाडा वाहतूक विभागाचे पोलीस कॉन्स्टेबल खैरमोडे यांनी चालक अनुज्ञप्तीची (लायसन्स) मागणी केली. त्याने अरेरावीची भाषा करीत लायसन्स नाही, असते तर दिले असते, आई वकील असल्याने पोलीस काही करु शकत नसल्याचेही त्याने सुनावले. त्यानंतर त्याने कार रेस करुन त्यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर कॉन्स्टेबल हारुगले आणि थोरवे यांनी तिथे धाव घेतली. त्यांनी त्याला थांबण्याचा इशारा करुनही त्याने त्यांच्याही अंगावर कार घालण्याचा प्रयत्न केला. नौपाडा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक स्वप्निल भामरे यांच्या पथकाने त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने नितिन कंपनीकडे पलायन केले. त्यावेळी खैरमोडे यांच्या डाव्या हाताच्या एका बोटालाही मार लागला. गाडी क्रमांकाच्या आधारे पोलिसांनी धर्मवीरनगर सेवा रस्त्यावरुन आदित्यला अटक केली. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मात्र त्याने नरमाईने घेत पोलिसांच्या अंगावर गाडी घालून चूक केल्याचे मान्य केले.
याप्रकरणी त्याच्याविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणणे, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे आदी कलमांखाली गुन्हा दाखल केल्याचे पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी सांगितले.