ठाण्यातील कुप्रसिद्ध मटकाकिंग बाबू नाडर याच्यावर खुनी हल्ला: तिघांची धरपकड
By जितेंद्र कालेकर | Published: September 22, 2019 10:33 PM2019-09-22T22:33:01+5:302019-09-22T22:39:14+5:30
एका क्षुल्लक कारणावरुन कुप्रसिद्ध मटका किंग बाबू नाडर याच्यावर चाकूने वार करुन खूनाचा प्रयत्न करणाऱ्या टोळीतील तिघांची कोपरी पोलिसांनी धरपकड केली आहे. तिघांमध्ये दोन अल्पवयीन मुलांचा समावेश असून त्यांच्यापैकी एकावर खूनाचा प्रयत्न, चोरी आणि हाणामारी असे गुन्हे दाखल आहेत.
ठाणे : संपूर्ण ठाणे जिल्ह्यात कुप्रसिद्ध असलेला मटकाकिंग बाबू नाडर याच्यावर चाकूचे वार करून पलायन केलेल्या हरेष तेलुरे (२८) याला कोपरी पोलिसांनी रविवारी अटक केली असून, दोन अल्पवयीन आरोपींनाही याप्रकरणी ताब्यात घेतले आहे. या खुनी हल्ल्यासाठी त्यांनी वापरलेला चाकू पोलिसांनी जप्त केला आहे. दरम्यान, नाडर याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत असून त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोपरीतील सिद्धार्थनगर ते कोपरी पुलाकडे जाणा-या वळणावरील एका मिष्ठान्न विक्रेत्याच्या दुकानाच्या बाजूलाच शनिवारी रात्री १०.४५ ते ११.१५ वाजण्याच्या सुमारास नाडर एका स्कूटरने आला. त्यावेळी दबा धरून बसलेल्या तिघांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला. एका आरोपीने त्याच्यावर दारूच्या नशेतच २२ इंची चाकूने सपासप सात ते आठ वार केले. या हल्ल्यानंतर तिघेही रात्रीच पसार झाले होते. हल्ला करण्याच्या वेळी बेभान झालेल्या एका अल्पवयीन आरोपीच्या तावडीतून नाडरची सुटका करण्यासाठी त्याच्या काही पंटर लोकांनी प्रयत्न केले होते. मात्र, त्यांच्यावरही त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याने नाडरची या हल्ल्यातून सुटका झाली नाही. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नाडरला त्याच्याच क्लबवरील लोकांनी तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगारकर आणि निरीक्षक दत्ता गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार तुकाराम डुंबरे, पोलीस कॉन्स्टेबल नितीन चव्हाण, गणेश पाटोळे आणि अरुण कांबळे यांच्या शोध पथकाने बुलडाणा येथे पलायनाच्या तयारीत असलेल्या हरेष याच्यासह तिघांनाही रविवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कसारा रेल्वेस्थानक येथून ताब्यात घेतले. याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला असून, यातील हरेषला रविवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली. तर, उर्वरित दोन आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना भिवंडीच्या बालन्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
...................
हल्ल्याचे कारण
दोनच दिवसांपूर्वी नाडरच्या काही पंटर लोकांशी या प्रकरणातील एका अल्पवयीन आरोपीचा वाद झाला होता. याच वादातून नाडरच्या क्लबमधील बाबू नामक कर्मचा-याला या अल्पवयीन आरोपीने मारहाण केली होती. हा वाद नाडरने सोडविला होता. हाच वचपा काढण्यासाठी अल्पवयीन आरोपीसह तिघांनी त्याच्यावर शनिवारी रात्री अचानक हल्ला केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
..........................
स्कूटरवर आला आणि घात झाला...
नेहमी आलिशान कारमध्ये येणारा मटकाकिंग नाडर हा शनिवारी नेमका एका स्कूटरने आला. त्याच्याबरोबर त्याची नेहमीची माणसेही जवळ नव्हती. हीच संधी साधत आरोपींनी त्याच्यावर हल्ला करीत पोटावर दोन्ही बाजूंनी चाकूने वार केले.
.........................
अल्पवयीन आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी
हल्लेखोरांपैकी एका अल्पवयीन आरोपीची गुन्हेगारी पार्श्वभूमी असून त्याने सात महिन्यांपूर्वीही एकाच्या भांडणात मध्यस्थी करणा-या हरुण रेलवानी यांच्यावर खुनी हल्ला केला होता. हरुण याने त्याला चोरीच्या गुन्ह्यातही पकडून दिले होते. याच रागातून त्याने हरुण याच्या पोटावर वार केले होते. त्याच्यावर बाबू नाडर याच्यासह खुनाचे प्रयत्न केल्याचे दोन गुन्हे, एक हाणामारीचा, तर एक चोरीचा गुन्हा कोपरी पोलीस ठाण्यात दाखल आहे.
.....................
नाडरलाही झाली होती अटक
कोपरीत मटका चालविणा-या बाबूला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने काही महिन्यांपूर्वी अटक केली होती. त्याच्याकडे जुगारात हरलेल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी झाली होती. याच प्रकरणात तत्कालीन सहपोलीस आयुक्त व्ही.व्ही. लक्ष्मीनारायण यांच्या आदेशाने त्याला अटकही झाली होती. त्याच्या अड्ड्यावर अनेकवेळा धाड टाकूनही तो पोलिसांना हुलकावण्या देत होता. त्याच्यावरील हल्ल्याने पोलीस आणि अवैध धंदे करणा-यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.