आरक्षित भूखंडांच्या संरक्षणासाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 01:41 AM2018-05-12T01:41:21+5:302018-05-12T01:41:21+5:30
अंबरनाथ नगरपालिका आणि सरकारी भूखंडांचे संरक्षण करण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. विकास आराखड्यात जे आरक्षण नमूद केले आहे
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपालिका आणि सरकारी भूखंडांचे संरक्षण करण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतला आहे. विकास आराखड्यात जे आरक्षण नमूद केले आहे, त्या भूखंडांचा अहवाल मुख्याधिकाऱ्यांनी मागवला आहे. तसेच ज्या भूखंडांवर अतिक्रमण आहे, त्याचाही अहवाल मागवला आहे.
अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातील महत्त्वाच्या आरक्षित भूखंडांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे या ठिकाणचे आरक्षण विकसित करणे पालिकेला अवघड जात आहे. सर्कस मैदानावरील अतिक्रमण तीन वर्षांत सर्वाधिक झाले असून संपूर्ण भूखंडांवर अतिक्रमण झाले आहे. अशीच काहीशी परिस्थिती शिव मंदिराजवळील महाविद्यालयाच्या भूखंडावरही झाली आहे. त्या ठिकाणीही झोपडपट्टी झालेली असून तेथे कारवाई करण्यात आलेली नाही. शहरात अनेक महत्त्वाच्या भूखंडांवरील स्थिती ही सारखी असल्याने पालिकेने या आरक्षित भूखंडाची माहिती एकत्रित करण्याचे काम सुरू केले आहे.
जे आरक्षित भूखंड विकसित करणे शक्य आहे, त्या भूखंडांची माहिती पालिकेने घेण्यास सुरुवात केली आहे. आरक्षणाच्या यादीतील जे महत्त्वाचे भूखंड आहेत, त्यांची वस्तुस्थिती मागवण्यात आली आहे. तसेच त्या जागेची मोजणीही करण्याचे काम हाती घेण्यात येत आहे. पालिकेच्या नावावर असलेल्या उताºयांवरून जागेच्या मोजणीचे काम सुरू करण्यात आले आहे. तर, काही जागा या सरकारच्या ताब्यात असल्याने त्यांची मोजणी करण्यासाठी तहसीलदार कार्यालयाकडून ना-हरकत प्रमाणपत्र घेऊन ते काम करण्यात येणार आहे.
अंबरनाथ नगरपालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकाºयांनी आरक्षित भूखंड आणि त्यावरील अतिक्रमणाबाबत अहवाल तयार करण्याचे काम सुरू केले आहे. कोहोज, खुंटवली येथील रुग्णालयांच्या भूखंडांचा विकास करण्यासाठी पीपीपी तत्त्वावर प्रस्ताव मागवण्याची तयारी पालिकेने सुरू केली आहे. या भूखंडांचा पालिकेच्या निधीतून विकास होणे शक्य नसल्याने हे काम हाती घेण्यात आले आहे. रुग्णालयाचा भूखंड विकसित करण्यासाठी रुग्णालय चालवणाºया संस्थांना या कामासाठी पाचारण करण्यात येणार आहे. हा विषय बैठकीत मांडला जाणार आहे.