अंबरनाथचे डम्पिंग ग्राऊंड स्थलांतरित करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 05:55 PM2021-08-09T17:55:31+5:302021-08-09T17:57:09+5:30

Ambernath dumping ground : अंबरनाथ नगरपालिका ज्या ठिकाणी अनधिकृतपणे डम्पिंग ग्राऊंड सुरू केले आहे, त्याच्या समोर आता न्यायालयाची इमारत उभी झाली आहे

Attempt to relocate Ambernath dumping ground once again | अंबरनाथचे डम्पिंग ग्राऊंड स्थलांतरित करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न

अंबरनाथचे डम्पिंग ग्राऊंड स्थलांतरित करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न

googlenewsNext

अंबरनाथ - पालिकेच्या डम्पिंग ग्राऊंड समोर न्यायालयाची इमारत उभी राहत असल्याने आता अंबरनाथ पालिकेने जांभूळ फाटा परिसरातील डम्पिंगच्या आरक्षित भूखंडावर कचरा टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा निर्णय यशस्वी होतो की पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या विरोधामुळे बारगळतो हे पाहणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. अंबरनाथ नगरपालिका ज्या ठिकाणी अनधिकृतपणे डम्पिंग ग्राऊंड सुरू केले आहे, त्याच्या समोर आता न्यायालयाची इमारत उभी झाली आहे. या डम्पिंगचा त्रास न्यायालयाला होणार असल्याने त्या संदर्भात न्यायालयाने पालिका प्रशासनाला दोन वेळा पत्रव्यवहार केला आहे. 

लवकरात लवकर हे डम्पिंग ग्राउंड शिफ्ट करण्यात पालिकेला बंधनकारक झाल्याने पालिकेने एमआयडीसी मधल्या एका भूखंडावर कचरा टाकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्या भूखंडावर कचरा टाकल्यास चिखलोली धरणाचे पाणी दूषित होईल असा आक्षेप नोंदविण्यात आला. त्यामुळे शहरातील कचरा कुठे टाकावा हा प्रश्न उपस्थित झाला होता. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी चिखलोली येथील सर्वे नंबर 132 मध्ये डम्पिंग ग्राउंड साठी स्वतंत्र जागा दिली आहे. त्याच जागेवर कचरा टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या संदर्भात पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील आदेश दिले आहेत. मात्र या आधी देखील अशाप्रकारे त्या जागेवर कचरा टाकण्याचा प्रयत्न अनेक वेळा फसला आहे. 

कचरा तर सोडाच त्याठिकाणी गांडूळखत प्रकल्प सुरू करण्यास देखील स्थानिकांनी विरोध केला आहे. त्यामुळे नव्या डम्पिंग ग्राऊंडला सहजासहजी मान्यता मिळणे अवघड आहे. ज्या ठिकाणी नवीन डम्पिंग ग्राऊंड सुरू करण्यात येणार आहे त्या डम्पिंग ग्राऊंडला लागूनच आता नव्याने गृहसंकुल उभे राहिले आहेत. एवढेच नव्हे तर याच जागेला लागून नवीन अंबरनाथ गाव आणि वडवली गाव असल्याने या दोन्ही गावांनी त्या प्रकल्पाला याआधी देखील विरोध केला आहे. अंबरनाथ आणि बदलापूर या दोन्ही पालिके यांचा एकत्रित घनकचरा प्रकल्प प्रस्तावित असून त्यासंदर्भात काम देखील सुरू आहे. मात्र हा प्रकल्प सुरू होईपर्यंत कचरा टाकावा कुठे हा प्रश्न पालिकेपुढे भेडसावत आहेत. त्यामुळे चिखलोली च्या जागेवर डम्पिंग सुरू होणार की ग्रामस्थ विरोध करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 
 

Web Title: Attempt to relocate Ambernath dumping ground once again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.