ठाण्यात चेंबूरच्या व्यापा-यास लुटण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 04:18 AM2018-02-05T04:18:21+5:302018-02-05T04:18:29+5:30
बँकेतून पाच लाख रुपये काढून भिवंडीकडे जाणा-या चेंबूर येथील एका व्यापा-यास १४ जणांच्या टोळीने लुटण्याचा प्रयत्न केला. व्यापा-याची जीप पंक्चर करून आरोपींनी घातपात करण्याचा प्रयत्नही केला.
ठाणे : बँकेतून पाच लाख रुपये काढून भिवंडीकडे जाणा-या चेंबूर येथील एका व्यापा-यास १४ जणांच्या टोळीने लुटण्याचा प्रयत्न केला. व्यापा-याची जीप पंक्चर करून आरोपींनी घातपात करण्याचा प्रयत्नही केला.
चेंबूर येथील छेडानगरातील लावण्या सोसायटीचे रहिवासी अशोक चरणदास ठक्कर (४८) यांचा चेंबूर येथेच व्यवसाय असून त्यांनी व्यवसायानिमित्त भिवंडी येथे गोदामही घेतले आहे. माजिवडा येथील युनियन बँक आॅफ इंडियाच्या कापूरबावडी शाखेमध्ये त्यांचे खाते आहे. त्यांचे बहुतांश व्यवहार याच बँकेतून होतात. २४ जानेवारी रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास ठक्कर यांनी बँकेतून पाच लाख रुपये काढले. त्यावेळी बँकेत ३० आणि ३५ वर्षीय दोन आरोपी त्यांच्यावर पाळत ठेवून होते. ठक्कर यांनी हा प्रकार हेरला. संशय आल्याने बँकेतून रोकड घेऊन ते लगेच जीपने भिवंडीकडे निघाले. नाशिक बायपासमार्गे भिवंडीकडे जात असताना मोटारसायकल आणि रिक्षा घेऊन जवळपास १४ आरोपींनी त्यांचा पाठलाग सुरू केला. या प्रकारामुळे अशोक ठक्कर कमालीचे हादरले.
दापोडा रोडवरील एका हॉटेलसमोर टोळीतील एका आरोपीने ठक्कर यांच्या जीपच्या टायरच्या दिशेने एक धारदार शस्त्र फेकले. त्यामुळे जीपचा टायर पंक्चर झाला. मात्र, ठक्कर यांच्या जीपचा टायर ट्युबलेस असल्याने हवा लगेच निघाली नाही. काही अंतरापर्यंत आरोपींनी ठक्कर यांचा पाठलाग केला. ठक्कर कसेबसे भिवंडी येथील त्यांच्या गोदामापर्यंत पोहोचले. या प्रकारामुळे घाबरलेल्या ठक्कर यांनी पोलिसांकडे तक्रार देण्यास उशीर केला. त्यांची तक्रार आल्यानंतर राबोडी पोलिसांनी शहानिशा करून शनिवारी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. गुन्हे अन्वेषण शाखेकडे या प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला आहे. बँकेचे सीसीटीव्ही फुटेज मागवून आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती तपास अधिकारी दत्ता सरक यांनी दिली.