ठाण्यात कौटूंबिक कलहातून मद्यपीने केला आत्महत्येचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 11:21 PM2019-01-27T23:21:04+5:302019-01-27T23:25:49+5:30
दारुच्या नशेमध्ये सिलेंडरचा स्फोट करुन आत्महत्येचा प्रयत्न करणारा रवींद्र रावत हा ८५ टक्के जळाला आहे. त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून त्याला वाचविण्यासाठी गेलेला एक पोलीस हवालदारही यात किरकोळ जखमी झाल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली.
ठाणे : पत्नी मुलीसह माहेरी गेल्याच्या वैफल्यातून रविंद्र सिंग रावत (३७, रा. पुराणिक होम टाऊन, घोडबंदर रोड, ठाणे) याने दारुच्या नशेमध्ये सिलेंडरचा स्फोट करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली. तो यात ८५ टक्के होरपळला असून त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्याला आत्महत्येपासून परावृत्त करण्यासाठी आलेले कासारवडवलीचे पोलीस हवालदार चौधरी हेदेखील यामध्ये किरकोळ जखमी झाले.
नेहमीच्या भांडणाला कंटाळून रविंद्रची पत्नी लतिका ही सात वर्षांच्या मुलीसह दोन दिवसांपूर्वीच माहेरी निघून गेली होती. पत्नी माहेरी गेल्यामुळे तो अस्वस्थ होता. २५ जानेवारी रोजी रात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास पुराणिक होम टाऊनच्या एका इमारतीमधील नवव्या मजल्यावर राहणाऱ्या रविंद्रसिंग याने दारुच्या नशेत धुमाकूळ घातल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक धाडवे यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे त्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. परंतू, तोपर्यंत त्याने घरातील स्वयंपाकाच्या सिलेंडरमधील गॅस लीक केला होता. या उग्र वासाने रहिवाशांनी तिथे गर्दी केली होती. एकीकडे रहिवाशांची गर्दी तर दुसरीकडे लायटर हातात घेतलेला रविंद्रसिंग हा दारुच्या नशेमध्ये तिथे होता. पोलिसांनी असे करु नको, हे विश्वासात घेऊन त्याला सांगण्याचा प्रयत्नही केला. पण त्याने गॅस लीक केल्यानंतर रात्री १ वाजण्याच्या सुमारास लायटर पेटविला. त्यामुळे स्फोट झाल्याने तो ८० ते ८५ टक्के भाजला. त्याची प्रकृती गंभीर असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला वाचविण्यासाठी गेलेले हवालदार चौधरी हेही या घटनेमध्ये किरकोळ जखमी झाले. ठाणे अग्निशमन दलाच्या कापूरबावडी येथील जवानांनी शर्थीच्या प्रयत्नाने ही आग आटोक्यात आणली.