दिव्यांग प्रवाशाला जाळण्याचा प्रयत्न; मुंब्रा रेल्वे स्थानकातील घटना, गर्दुल्ला हल्लेखोर पसार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 07:23 AM2023-03-27T07:23:35+5:302023-03-27T07:23:49+5:30
रेल्वेस्थानकातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पसार झालेल्या हल्लेखोर दिव्यांगाचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी सांगितले.
ठाणे : मुंब्रा रेल्वेस्थानकात लोकल आल्यावर एका गर्दुल्ल्या दिव्यांगाने पेटता रूमाल दिव्यातील प्रमोद वाडेकर (वय ३४) या अन्य एका दिव्यांग सहप्रवाशाच्या अंगावर फेकल्याची घटना शनिवारी रात्री घडली. या घटनेत वाडेकर यांचे दोन्ही हात होरपळले असून त्यांना मुंबईतील किंग एडवर्ड मेमोरियल (केईएम) रुग्णालयात दाखल केले आहे.
याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हल्लेखोर गर्दुल्ला पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दिव्यातील रहिवासी असलेले वाडेकर हे पवईतील एका हॉटेलमध्ये नोकरीला आहेत. शनिवारी रात्री ते नेहमीप्रमाणे कांजूरमार्ग येथे छत्रपती शिवाजी टर्मिनल (सीएसटी) ते कल्याण या उपनगरी रेल्वेतून घरी येत होते, तर फरार हल्लेखोर हा आधीपासूनच दिव्यांग डब्यातून प्रवास करीत होता.
साधारण शनिवारी रात्री १०.४५ वाजण्याच्या सुमारास ही लोकल मुंब्रा रेल्वेस्थानकात आली. त्यावेळी वाडेकर यांच्या अंगावर एक प्रकारच्या सोल्युशनची नशा करणाऱ्या एका दिव्यांग व्यक्तीने त्याच्याकडील रूमाल पेटवून फेकला. तो रूमाल वाडेकर यांच्या डाव्या हातावर पडला. आधी काय झाले हे वाडेकर यांच्या लक्षात आले नाही. तेव्हा आग लागल्याचा प्रकार त्यांना अन्य एका सहप्रवाशाने निदर्शनास आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या डाव्या हाताच्या पंजाला आणि उजव्या हाताला दुखापत झाली, तर रूमाल फेकणाऱ्याने मुंब्रा रेल्वेस्थानकात उडी घेऊन पोबारा केला.
या घटनेची माहिती लोहमार्ग पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी वाडेकर यांना दिवा रेल्वे स्थानकात उतरवून तातडीने कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना मुंबईतील केईएम रुग्णालयात हलवण्यात आले. याप्रकरणी कलम ३२६ नुसार ठाणे रेल्वे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
सीसीटीव्हीद्वारे तपास सुरू
रेल्वेस्थानकातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पसार झालेल्या हल्लेखोर दिव्यांगाचा शोध सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांनी सांगितले. हा प्रकार नेमका कशामुळे घडला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, पसार दिव्यांगाला लवकरच अटक केली जाईल, अशी माहिती कांदे यांनी दिली.