ग्रामस्थांनी अडवलेला रस्ता एमआयडीसीकडून सुरू करण्याचा प्रयत्न
By पंकज पाटील | Published: June 21, 2023 05:54 PM2023-06-21T17:54:59+5:302023-06-21T17:56:11+5:30
अंबरनाथ तालुक्यातील पाईपलाईन रोडच्या भूसंपादनाचा वाद चिघळण्याची शक्यता
अंबरनाथ : अंबरनाथ तालुक्यातील वसार गावात शेतकऱ्यांनी अडवलेला अर्धा राज्य महामार्ग पोलीस फौजफाटा घेऊन खुला करण्याचा प्रयत्न एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी केला. याला ग्रामस्थांनी जोरदार विरोध केला असून हा वाद आता चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या ठिकाणी स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनीही धाव घेत एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना प्रश्न सोडवण्यात स्वारस्य नसून फक्त पैसे हवे असल्याचा आरोप केला आहे.
अंबरनाथ तालुक्यातील वसार गावातल्या शेतकऱ्यांची जमीन एमआयडीसीने सुमारे ५० वर्षांपूर्वी पाईपलाईन टाकण्यासाठी संपादित केली होती. मात्र हे भूसंपादन करताना केवळ एका कागदी चुकीमुळे रस्ता आणि पाईपलाईन ज्या जागेतून टाकण्यात आली आहे, त्याऐवजी बाजूची जागा एमआयडीसीच्या नावावर झाली आहे. त्यामुळे एकीकडे रस्ता आणि पाईपलाईनची जागाही गेली आणि बाजूची जागाही एमआयडीसीच्या नावावर झाल्यामुळे तिथेही काही करता येत नाही, अशा पेचात इथले शेतकरी अडकले. ही कागदी चूक सुधारण्यासाठी मागील ५० वर्षांपासून लढा देऊनही एमआयडीसी हा प्रश्न सोडवण्यासाठी स्वारस्य दाखवत नसल्यानं अखेर वसार गावातील शेतकऱ्यांनी डोंबिवली बदलापूर पाईपलाईन महामार्गाची एक मार्गिका वसार गावाजवळ बंद केली. तसेच या रस्त्यावर शेतीसुद्धा करायला सुरुवात केली होती. यानंतरही एमआयडीसीकडून हा प्रश्न सोडवण्यासाठी कोणतंही स्वारस दाखवण्यात आले नव्हते. मात्र बुधवारी सकाळी अचानक एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांचा फौजफाटा घेऊन या ठिकाणी येत हा रस्ता मोकळा करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी या ठिकाणी धाव घेत एमआयडीसी अधिकाऱ्यांना विरोध केला.
त्यामुळे हा वाद आता चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबतची माहिती मिळताच स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांनीही या ठिकाणी धाव घेत एमआयडीसी अधिकाऱ्यांच्या या कृतीला विरोध केला. एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना केवळ एक कागदी चूक सुधारण्यासाठी मागील ५० वर्षात वेळ मिळालेला नसून त्यांना फक्त पैसे हवे आहेत, असा आरोप आमदार गणपत गायकवाड यांनी केला. या सगळ्यानंतर येत्या अधिवेशनातही आपण हा मुद्दा लावून धरणार असल्याचे गणपत गायकवाड यांनी सांगितले आहे.