महिलेच्या अपहरणाचा रिक्षाचालकाकडून प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 05:31 AM2017-08-19T05:31:40+5:302017-08-19T05:31:45+5:30
मानपाडा रोडवरील स्टार कॉलनीजवळ तीन महिला प्रवाशांना रिक्षाचालकाने भाडे नाकारले.
डोंबिवली : मानपाडा रोडवरील स्टार कॉलनीजवळ तीन महिला प्रवाशांना रिक्षाचालकाने भाडे नाकारले. त्यांनी याविषयी जाब विचारताच त्याने एका महिलेस जबरदस्तीने रिक्षात बसवत तिचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी महिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी रिक्षाचालक शंकर विलासनाथला अटक केली. त्याच्याविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.
स्टार कॉलनीजवळ मनीषा राणे, त्यांची मुलगी विशाखा व मैत्रीण अमिता हेदळकर या रिक्षाच्या प्रतीक्षेत होत्या. मानपाडा रोडवर स्टेशनच्या दिशेने जाणाºया रिक्षाचालकाला त्यांनी हात दाखवला. त्या वेळी रिक्षात एकही प्रवासी नव्हता. त्याने डोंबिवली स्टेशनकडे जाण्यासाठी ३० रुपये भाडे होईल, असे सांगितले. तेवढ्यात, एक प्रवासी तेथे आला. त्याला पेंढरकर कॉलेजजवळ जायचे होते. त्याला रिक्षाचालकाने ४० रुपये भाडे होईल, असे सांगितले. तो प्रवासी तयार झाल्याने त्याचे भाडे घेतले.
या महिलांनी त्याला पुन्हा गांधी चौकात पाहिले. त्यांनी त्याला आमचे भाडे का नाकारले, जास्तीचे भाडे मिळाल्यावर कमी भाडे नाकारणार का, असे सवाल केले. यामुळे संतप्त झालेल्या रिक्षाचालकाने हेदळकर यांचा हात धरून रिक्षात बसवले. त्याने रिक्षा शिवाजी उद्योगच्या दिशेने एक किलोमीटरपर्यंत पळवली. हा प्रकार पाहून मनीषा यांनी मदतीसाठी दोन दुचाकीस्वारांना आवाज दिला. त्यांनी रिक्षाचालकाचा पाठलाग करून त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.