पूर्वीच्या भांडणातून तरुणावर चाकूचे वार, खुनाचा प्रयत्न; मध्यस्थी केल्यास ठार करण्याची धमकी
By जितेंद्र कालेकर | Published: December 20, 2023 12:16 AM2023-12-20T00:16:48+5:302023-12-20T00:17:14+5:30
आरोपी आयुष पवार अटकेत, नौपाडा पोलिसांची कारवाई
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : पूर्वीच्या भांडणातून कुणाल चापले (२१, रा. चंदनवाडी, ठाणे) याच्यावर चाकूने वार करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या त्रिकूटापैकी आयुष पवार (१९, रा. गणेशवाडी, ठाणे) याला अटक केल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी मंगळवारी दिली.
ठाण्याच्या चंदनवाडी भागातील रूपादेवी मंदिरासमोरील चौकात ७ डिसेंबरला रात्री ८ वाजता कुणाल हा वडिलांची वाट पाहत उभा होता. त्यावेळी आयुष पवार, यश पवार आणि त्यांचा आणखी एक साथीदार यांनी जुन्या भांडणाच्या रागातून कुणाल याला शिवीगाळ केली. तर आयुष याने चाकूने त्याच्या डोक्यावर वार करून त्याला जखमी केले. या हल्ल्यात कुणाल खाली पडल्यावर यश पवार आणि त्याच्या साथीदाराने त्याला पकडून मारहाण केली. तो मदतीसाठी ओरडत असताना आयुष याने त्याच्या हातातील चाकूने कुणालच्या डोक्यावर पाठीमागून आणि समोरून तीन ते चार वार केले.
त्यावेळी मदतीला येणाऱ्या लोकांना उद्देशून त्याने चाकू हवेत फिरवत शिवीगाळ करीत “मध्ये कोणी आल्यास खल्लास करून टाकेन,” अशी धमकीही दिली. लोकांच्या दिशेने चाकू उगारून दहशत निर्माण केल्याने लोकांनी तिथून पळ काढला. त्यानंतरही कुणाल याला लाथाबुक्क्यांनी आयुष याच्यासह तिघांनी जबरी मारहाण केली. या प्रकरणात वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक विद्या पाटील आणि उपनिरीक्षक राख यांच्या पथकाने आयुषला ९ डिसेंबर रोजी अटक केली. उर्वरित आरोपींचाही शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.