खुनाचा प्रयत्न, पसार झालेल्या चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:46 AM2021-09-21T04:46:20+5:302021-09-21T04:46:20+5:30
ठाणे : एका तरुणाला मारहाण होत असताना ते सोडविण्यासाठी गेलेल्या संदीप मराछीवाला याला मारहाण करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या राज ...
ठाणे : एका तरुणाला मारहाण होत असताना ते सोडविण्यासाठी गेलेल्या संदीप मराछीवाला याला मारहाण करून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या राज बजारी याच्यासह चौघांना वर्तकनगर आणि ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट पाचने अटक केली. यातील राजला रविवारी तर इतर चौघांना सोमवारी अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शास्त्रीनगर येथील संदीप मराछीवाला यास त्याच भागातील राज बजारी आणि त्याचे तीन साथीदार १९ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मारहाण करीत होते. तेव्हा अंशू वर्मा हे त्यांचे भांडण सोडविण्यासाठी गेले. त्याला मदत केल्याच्या रागातून राज आणि त्याच्या इतर तीन साथीदारांनी चॉपरने अंशू वर्मा यांच्या कानावर तसेच डोक्यावर दोन वार केले. यात तो गंभीर जखमी झाल्यानंतर वर्मा हे तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करीत होते. त्याचवेळी राज याने लाकडी दांडक्याने वर्मा यांच्या उजव्या हातावर मारहाण केली. वर्मा यांच्या तक्रारीवरून वर्तकनगर पोलीस ठाण्यात १९ सप्टेंबर रोजी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांच्या पथकाने राज बंजारी (२१, रा. ठाणे) याला अवघ्या तीन तासांमध्ये अटक केली. त्याला २४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. यातील आगीन यादव (२३, शास्त्रीनगर, ठाणे), मनीष गुरव (२२) आणि इतवार (२२) यांना गुन्हे शाखेच्या वागळे इस्टेट युनिटचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके यांच्या पथकाने अटक केली.