कोपरीत गुंडाच्या खूनाचा प्रयत्न: दोघा भावांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2020 11:20 PM2020-09-23T23:20:38+5:302020-09-23T23:25:30+5:30
भांडणात मध्यस्थी केल्याच्या रागातून दीपक उर्फ दीपू रेवणकर (२५) या गुंडाच्या पोटावर चॉपरचे वार करुन खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी विशाल चेकालिया (२०) याला मंगळवारी तर त्याच्या भावाला बुधवारी कोपरी पोलिसांनी अटक केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: पूर्ववैमनस्यातून दीपक उर्फ दीपू रेवणकर (२५, रा. सिद्धार्थनगर, कोपरी, ठाणे) या गुंडाच्या पोटावर चॉपरचे वार करुन खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी विशाल चेकालिया (२०) याला मंगळवारी तर त्याच्या भावाला बुधवारी कोपरी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एक चॉपर आणि लोखंडी सळई हस्तगत करण्यात आली आहे.
कोपरीतील सिद्धार्थनगर भागात २१ सप्टेंबर रोजी दीपकच्या मोठ्या भावाबरोबर विशाल आणि त्याच्या लहान भावाचे भांडण झाले होते. या भांडणामध्ये दीपकने मध्यस्थी केली होती. याच भांडणाचा वचपा काढण्यासाठी २२ सप्टेंबर रोजी
पहाटे १ वाजण्याच्या सुमारास दीपक सिद्धार्थनगर येथून जात होता. त्यावेळी त्याचा विशाल आणि विकास या दोन्ही भावांशी वाद झाला. याच वादातून विशालने दीपकच्या पोटात चाकूने वार केले. तर विकासने लोखंडी सळईने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या दीपकवर एका खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. तो अद्यापही बेशुद्ध असल्याचे कोपरी पोलिसांनी सांगितले. दरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगरकर आणि दत्तात्रय गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक मनिष पठाणे आणि जमादार तुकाराम डुंबरे यांच्या पथकाने मंगळवारी रात्री विशाल याला अटक केली. त्यापाठोपाठ विकासलाही ताब्यात घेतले असून त्याला भिवंडी येथील बाल सुधारगृहात ठेवण्याचे आदेश भिवंडी बाल न्यायालयाने दिले आहेत.