कटकारस्थान केल्याच्या संशयातून खुनाचा प्रयत्न करणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:15 AM2021-03-04T05:15:38+5:302021-03-04T05:15:38+5:30
ठाणे : कटकारस्थान केल्याच्या संशयातून प्रेमजीत सिंग (३८, रा. चितळसर, ठाणे) याच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या राजेश कोंडविलकर (३४, रा. ...
ठाणे : कटकारस्थान केल्याच्या संशयातून प्रेमजीत सिंग (३८, रा. चितळसर, ठाणे) याच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या राजेश कोंडविलकर (३४, रा. मनोरमानगर, ठाणे) या तडीपार गुंडाला कापूरबावडी पोलिसांनी सोमवारी अटक केली. त्याला ४ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
प्रेमजीत हा आपल्याविरुद्ध कटकारस्थान करतो, असा राजेशला गेल्या काही दिवसांपासून संशय होता. या संशयातून त्याने प्रेमजीतच्या डोक्यावर आणि मानेवर मटण कापण्याच्या सुऱ्याने जबर वार करून खुनी हल्ला केला. त्याला तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रियतमा मुठे आणि उपनिरीक्षक संजय पाटील यांच्या पथकाने त्याला १ मार्च रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास अटक केली.
............
जामिनावर सुटताच केला हल्ला
राजेश याच्याविरुद्ध अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे यापूर्वीच कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्यामुळेच त्याला ठाण्यातून तडीपार केले आहे. तरीही तो कापूरबावडी परिसरात फिरत असल्याचे आढळल्याने कापूरबावडी पोलिसांनी त्याला २७ फेब्रुवारी २०२१ रोजी अटक केली होती. ठाणे न्यायालयाने मात्र त्याची २८ फेब्रुवारी रोजी वैयक्तिक जामिनावर मुक्तता केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याने हा खुनी हल्ला केल्याची माहिती सूत्रांनी दिली.