सुपारी घेऊन खुनाचा प्रयत्न, गुंडाला १० वर्षे कारावास
By जितेंद्र कालेकर | Published: September 15, 2023 09:23 PM2023-09-15T21:23:23+5:302023-09-15T21:23:46+5:30
ठाणे न्यायालयाचा निकाल, पुराव्याअभावी दोघांची निर्दोष मुक्तता
ठाणे : ठाण्यातील टिकुजिनीवाडी परिसरात एकावर चाकूचा हल्ला करून त्याच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या आशिष सुर्वे (२५, रा. ठाणे) या आरोपीला ठाणे सत्र न्यायालयाने १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सुर्वे याने सुपारी घेऊन हा हल्ला केल्याचा त्याच्यावर आरोप होता, तर सुपारी दिल्याचा आरोप असलेल्या जयदीप चौधरी आणि विष्णुशंकर तिवारी यांची मात्र सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता झाल्याची माहिती सरकारी वकील वर्षा चंदने यांनी शुक्रवारी दिली.
ठाण्यातील टिकुजिनीवाडी परिसरातील उमेश वरघट, जयदीप चौधरी आणि विष्णुशंकर तिवारी यांचे आपसात वैर होते. त्यातून चौधरी आणि तिवारी यांच्याकडून उमेश यांना मारण्यासाठी आशिष या गुंडाला सुपारी दिल्याचा आरोप होता. आशिष याने उमेशवर २०१५ मध्ये चाकूने हल्ला केल्याप्रकरणी कापूरबावडी पोलिस ठाण्यात ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण गुन्हे शाखेकडे वर्ग झाले होेते. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी यातील आरोपींना अटक करून दोषारोपपत्र ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केले होते. त्यावर बुधवारी ठाणे जिल्हा सत्र न्यायाधीश ए.एन. सिरसीकर यांच्यासमोर अंतिम सुनावणी झाली.
सरकारी वकील वर्षा चंदने यांनी १९ साक्षीदारांसह पुरावे सादर केले. पुरावे आणि साक्ष ग्राह्य मानून न्यायाधीशांनी आरोपी आशिष याला दोषी ठरवून शिक्षा सुनावली. हे प्रकरण तपासाधीन असल्यापासून आरोपीने तपासी अधिकारी, पोलिस यंत्रणा, न्याययंत्रणा तसेच सरकारी वकील, फिर्यादी यांचे वकील यांच्याविरुद्ध निरनिराळे आरोप व तक्रारी अर्ज करून न्यायालयीन कामात अनेकदा अडथळे आणण्याचा प्रयत्न केल्याचाही आराेप आहे. यातील फियार्दी उमेश वरघट यांच्यातर्फे वकील सुजाता जाधव यांनी हे प्रकरण हाताळले.