जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, दोघे अटकेत
By अजित मांडके | Updated: February 17, 2024 16:25 IST2024-02-17T16:24:59+5:302024-02-17T16:25:12+5:30
या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तत्काळ दोघा आरोपींना अटक केली आहे.

जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, दोघे अटकेत
ठाणे : पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरुन तीघा जणांनी फिर्यादी ऋतिक दळवी यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ठाण्यातील लोकमान्य नगर भागात घडली आहे. या हल्यात दळवी हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर या प्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तत्काळ दोघा आरोपींना अटक केली आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नावे अभिजीत दास (३५) व क्रिती दास (३०) अशी असून ते लोकमान्य नगर भागात वास्तव्यास आहेत. तर अन्य एक आरोपी फरार आहे. ऋतिक आणि अभिजीत दास यांच्यात पूर्वी भांडण झाले होते. त्याचा राग मनात धरुन अभिजीत, क्रिती आणि त्यांचा एक साथीदार यांनी आपसात संगणमत करुन १५ फेब्रुवारी रोजी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास येथील खताळ क्लिनीक जवळ ऋतिक याच्यावर उजव्या दंडावर व पोटावर चाकून वार केले.
तसेच त्यांच्या आईस स्टीलच्या रॉडने त्यांनी मारहाण केली. यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांनी उपचारार्थ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी वर्तक नगर पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल झाला असून या प्रकरणी पोलिसांनी अभिजीत आणि क्रिती यांना तत्काळ अटक केली आहे. तर त्यांचा एक साथीदार अद्याप फरार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वर्तक नगर पोलीस करीत आहेत.