भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी पालिका मुख्यालय समोर आत्मदहनाचा प्रयत्न
By नितीन पंडित | Published: March 1, 2024 07:24 PM2024-03-01T19:24:15+5:302024-03-01T19:24:42+5:30
मागील वर्षी नाले सफाईसाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. त्यानंतर ही नाले सफाई झाली नसल्याचा आरोप परशुराम पाल याने केला होता.
भिवंडी: महानगरपालिका क्षेत्रातील पावसाळ्यापूर्वी होणारी नालेसफाई ही नेहमीच वादात सापडली असून कोट्यावधी रुपये खर्च करून सुद्धा शहरातील असंख्य सखल भागात व मुख्य रस्त्यांवर दरवर्षी पाणी साचत असल्याने या नालेसफाईबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असतात.
नालेसफाईच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी परशुराम पाल या व्यक्तीने शुक्रवारी महापालिका मुख्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. यावेळी पोलिसांनी त्यास ताब्यात घेतल्याने पुढचा बाका प्रसंग टळला आहे.
मागील वर्षी नाले सफाईसाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. त्यानंतर ही नाले सफाई झाली नसल्याचा आरोप परशुराम पाल याने केला होता. त्यासाठी पालिका प्रशासना कडे केलेल्या तक्रारी बाबत कोणतीही कारवाई नाले सफाई ठेकेदारांवर न झाल्याने अखेर पाल यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता.
शुक्रवारी दुपारी हातात पेट्रोलची बाटली घेऊन मुख्यालय समोर दाखल झालेल्या परशुराम पाल याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत असतानाचा भिवंडी शहर पोलिसांनी त्यावर झडप टाकून त्यास ताब्यात घेतले.त्यानंतर त्यास पोलिस ठाण्यात नेऊन त्याविरोधात कारवाई करण्यात येत आहे.